एमआयडिसी भोसरी : कंपनीच्या मायक्रोसॉफ्ट टीम्स ग्रुपमध्ये बेकायदेशीर प्रवेश करून कंपनीच्या संचालकाच्या नावासारखी बनावट आयडी वापरत ३० लाख रुपये परस्पर खात्यात वळवून घेतल्याचा धक्कादायक प्रकार भोसरीतील बालाजीनगर परिसरात घडला. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात अज्ञात आयडीधारकाविरुद्ध फसवणूक व माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ ऑगस्ट रोजी दुपारी १.१० ते २.३० वाजण्याच्या सुमारास टेल्को रोड, बालाजीनगर येथील जी.एन.एस. इंजिनिअरिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत हा प्रकार घडला. कंपनीचे कर्मचारी गजेंद्र भारत भोरे (वय ३२) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
कंपनीचे संचालक संजय पनवार यांच्या नावासारखी दिसणारी ‘Sanjay Panwar’ नावाची बनावट आयडी वापरणाऱ्या व्यक्तीने कंपनीच्या मायक्रोसॉफ्ट टीम्स ग्रुपमध्ये अनधिकृत प्रवेश केला. त्यानंतर ICICI Bank मधील MAA DAKHINAKALI ENTERPRISES या खात्यावर तातडीने ३० लाख रुपये पाठविण्याचा संदेश ग्रुपवर पाठविण्यात आला.
कंपनीतील संबंधित व्यक्तींनी हा संदेश अधिकृत असल्याचे समजून बँक ऑफ बडोदा येथील कंपनीच्या खात्यातून ३० लाख रुपये संबंधित खात्यात वर्ग केले. त्यानंतर फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले.
याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी बीएनएस कलम ३१८(४), ३१९ तसेच माहिती-तंत्रज्ञान कायदा २००० मधील कलम ६६(डी), ६६(सी) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून बनावट आयडीचा वापर करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यात येत असून, आर्थिक व्यवहार आणि सायबर पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे.