सातारा : सोशल मीडियाचा सकारात्मक आणि समाजोपयोगी वापर करत ‘ढवळे वधू-वर सूचक’ या ग्रुपच्या माध्यमातून आतापर्यंत तब्बल १,६५० हून अधिक मुला-मुलींचे विवाह जुळल्याचा दावा करण्यात आला आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात आणि आंध्र प्रदेशातील विविध जाती-धर्मातील कुटुंबांना या उपक्रमाचा लाभ झाला आहे.
या उपक्रमाचे ग्रुप ॲडमिन सुभाष ढवळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून वधू-वरांच्या कुटुंबांना घरबसल्या स्थळांची माहिती उपलब्ध करून देण्याचे काम सुरू केले. विवाहासाठी योग्य स्थळ शोधताना पालकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमातून अनेक कुटुंबांना अपेक्षित स्थळ मिळाले असून अनेक विवाह संपन्न झाले आहेत.
विशेष म्हणजे, केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता कर्नाटक, गुजरात आणि आंध्र प्रदेशातील कुटुंबांनीही या माध्यमाचा लाभ घेतला आहे. विविध जाती-धर्मातील मुला-मुलींचे विवाह जुळवून देण्याच्या माध्यमातून सामाजिक सलोखा आणि परस्पर संपर्क वाढविण्यासही या उपक्रमाची मदत होत आहे.
या उल्लेखनीय कार्याबद्दल शेतकरी संघटना, रयत सातारा अध्यक्ष संजय पार्वती शंकर लाड यांनी सुभाष ढवळे यांचे अभिनंदन करून आभार व्यक्त केले. समाजोपयोगी कार्याची ही परंपरा अशीच पुढे सुरू राहावी, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.
