चाकण : पुणे-नाशिक महामार्गावर एचपी पेट्रोलपंपाजवळ आरती हॉटेलसमोर एसटी बसने रस्त्यावर उभ्या असलेल्या खासगी बसला पाठीमागून धडक दिल्याची घटना २१ ऑगस्ट रोजी सकाळी घडली. या अपघातात एसटी बसमधील चार प्रवासी किरकोळ जखमी झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एसटी बस क्रमांक MH 13 CU 8473 ही मंचर-पुणे-नाशिक मार्गावर धावत होती. सकाळी चाकण-तळेगाव चौकातून प्रवासी घेऊन बस नाशिकच्या दिशेने जात असताना एचपी पेट्रोलपंपाजवळ आरती हॉटेलसमोर एक खासगी बस रस्त्यावर उभी होती.
एसटी बस चालकाने गर्दीमुळे बस रस्त्याच्या डाव्या बाजूला घेतली. त्यावेळी समोर उभी असलेली खासगी बस दिसल्यानंतर एसटी थांबविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, बसचे ब्रेक न लागल्याने एसटी बसने खासगी बसला पाठीमागून धडक दिली.
या अपघातात प्रभागी पोपट चव्हाण (वय ४३, रा. नारायणगाव), नंदा बाळासाहेब शिंदे (वय ६३, रा. मंचर), लक्ष्मण दगड तलवारे (वय ५०, रा. वेड) आणि महादेवी लक्ष्मण तलवारे हे चार प्रवासी किरकोळ जखमी झाले.
या प्रकरणी सोपान भारत कानवडे (चालक) यांच्याविरोधात चाकण उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६८५/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५(अ) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स.पो.नि दगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.