पिंपरी-चिंचवड पिंपळे सौदागर : इन्स्टाग्रामवरील चॅटिंग आणि फोटोचे पुरावे असल्याचे सांगून पोलीस तक्रार न करण्याच्या बदल्यात तब्बल ३० लाख रुपयांची मागणी करत तरुणाकडून १३ लाख रुपये खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार पिंपळे सौदागर परिसरात समोर आला आहे. तसेच, पुन्हा पैशांची मागणी करून पैसे न दिल्यास दोन दिवसांत जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिल्याप्रकरणी सांगवी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी विराज गोपाळ कुटे (वय २१, रा. विश्वशांती कॉलनी, पिंपळे सौदागर) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शुभम लक्ष्मण निवेकर (वय १९, रा. शिवराज नगर कॉलनी क्रमांक २, काळेवाडी) आणि हर्षवर्धन बलभीम आयवळे (वय २१, रा. शिवराज नगर कॉलनी क्रमांक २, काळेवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून हर्षवर्धन आयवळे याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा लहान भाऊ संग्राम गोपाळ कुटे याने आरोपीच्या बहिणीसोबत इन्स्टाग्रामवर केलेले चॅटिंग आणि त्यांचे फोटोचे पुरावे आपल्याकडे असल्याचे आरोपीने सांगितले. या प्रकरणी कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार करू नये, यासाठी ३० लाख रुपये देण्याची मागणी करण्यात आली. पैसे न दिल्यास जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत आरोपीने जुलै २०२४ ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत संग्राम कुटे याच्याकडून १३ लाख रुपये घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
दरम्यान, १८ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी तीनच्या सुमारास संग्राम कुटे पिंपळे सौदागर गावात कामानिमित्त गेला असता आरोपी शुभम निवेकर याने त्याला अडवून पुन्हा इन्स्टाग्रामवरील चॅटिंग आणि फोटोचे पुरावे आपल्याकडे असल्याचे सांगितले. प्रकरण कायमचे मिटवायचे असेल तर आणखी पैसे द्यावे लागतील, अन्यथा दोन दिवसांत जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी सांगवी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०८(३), ३०८(५), ३५१(२), ३(५) तसेच भादंवि कलम ३८५, ३८६, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास खंडणी पथकाचे पोलीस अधिकारी करीत आहेत.