भोसरी प्रतिनिधी : वाढदिवसाच्या पार्टीत दारू पिल्यानंतर झालेल्या शाब्दिक वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. सात ते आठ जणांनी एका तरुणाला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर फुटलेल्या काचेच्या बाटलीने पोटाच्या डाव्या बाजूस व पाठीवर वार करून गंभीर जखमी केल्याची घटना भोसरीतील शास्त्री चौक येथे १९ ऑगस्ट रोजी मध्यरात्री घडली.
या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३३७/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९(१), ११५(२), ३५२, १८९(२), १८९(४), १९१(२), १९१(३), १९० तसेच भादंवि कलम ३०७, ३२३, ५०४, १४२, १४४, १४७, १४८, १४९ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचे पती अमर कापडे हे त्यांचा मित्र साहिल मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त गेले होते. पार्टीदरम्यान साहिल मोरे याच्या मित्रांमध्ये दारू पिल्यानंतर शाब्दिक बाचाबाची झाली. या वादातून आरोपींनी अमर कापडे यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर फुटलेल्या काचेच्या बाटलीने पोटाच्या डाव्या बाजूस आणि पाठीवर वार केल्याने ते गंभीर जखमी झाले.
या प्रकरणी महेश प्रकाश पाटील (३०), प्रथमेश राजू पाटील (२१), संतोष सतीश सोनकांबळे (२५), केतन दिनकर सोमवंशी (२३), विकास अशोक मयनाळे (२५), पवन रोहिदास शिंदे (२२), संकेत शाम सरवदे (२१) यांच्यासह एका विधिसंघर्षग्रस्त बालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.
घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक केदारी व सहाय्यक पोलीस निरीक्षक टापरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.