पुणे,मावळ,तळेगाव एमआयडीसी: तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी कारवाई करत एका विधीसंघर्षित बालकाच्या ताब्यातून एक देशी बनावटीचा लोखंडी गावठी कट्टा जप्त केला. याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ९.०५ वाजता वराळे फाटा ते वराळे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर स्वामी मेडिकलसमोर ही कारवाई करण्यात आली. अजय भीमराव जाधव (वय २५, रा. धामणे, ता. मावळ, जि. पुणे) याच्यासह विधीसंघर्षित बालकांचा या प्रकरणात समावेश आहे.
संशयितांकडून एक देशी बनावटीचा लोखंडी गावठी कट्टा मिळून आला. संबंधितांकडे हा कट्टा बाळगण्याचा कोणताही परवाना किंवा कायदेशीर अधिकार नसल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. तसेच, पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) अन्वये मनाई आदेश लागू असतानाही आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली.
याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २३१/२०२६ नुसार भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.