व्हॉट्सॲप ग्रुपवरून दिले ‘मार्गदर्शन’; नफा व मुद्दल काढता न आल्याने भोसरीतील तरुणाची पोलिसांत धाव
भोसरी | प्रतिनिधी : शेअर बाजारात मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका आयटी डेव्हलपरची तब्बल ९ लाख ३८ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आल्याची घटना भोसरी येथे समोर आली आहे. याप्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शुभम संजय जोशी (वय ३१, रा. वसिंल पार्क, संत निरंकारी आश्रमाजवळ, भोसरी) यांना २८ जुलै ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत शेअर बाजारात गुंतवणुकीसंदर्भात विविध माध्यमांतून संपर्क करण्यात आला. ‘Julius Baer Investors Hub’, ‘Help & Support’ तसेच ‘Payment Group’ अशा व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सहभागी करून घेत त्यांना शेअर बाजारात गुंतवणुकीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या व्यक्तींनी दिलेल्या सूचनेनुसार फिर्यादीने विविध बँक खात्यांमध्ये एकूण ९ लाख ३८ हजार रुपये जमा केले. त्यानंतर संबंधित वेबसाइटवर गुंतवणुकीतून मिळालेला नफा व मुद्दल रक्कम दिसत असल्याने त्यांनी ती रक्कम काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पैसे काढता आले नाहीत. त्यानंतर वेबसाइटवरील ‘Withdrawal’ पर्यायही काढून टाकण्यात आल्याचे फिर्यादीच्या निदर्शनास आले.
याबाबत संबंधित व्यक्तींशी संपर्क साधला असता, ‘शेअर्स विकल्यास रक्कम Shiprocket IPO मध्ये गुंतवली जाईल’, तसेच अन्य कारणे सांगून पैसे काढण्यास टाळाटाळ करण्यात आली. फिर्यादीने संबंधित मोबाइल क्रमांकांवर कॉल व संदेश करून रक्कम परत मिळविण्याची विनंती केली. मात्र, समोरील व्यक्तींनी प्रतिसाद देणे टाळल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
या प्रकरणी सोनल जगत्राथ नाईक यांच्यासह अन्य सात जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३१६(२), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००८ मधील कलम ६६(डी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा रजिस्टर क्रमांक ३८१/२०२६ असून, १८ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ८.३८ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.