स्थानिक गुन्हे शाखा व शिरूर पोलिसांची संयुक्त कारवाई; ११० ग्रॅम एम.डी.सह मोटारसायकल जप्त
पुणे (ग्रा) शिरूर : शिरूर परिसरात अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या दोन आरोपींवर स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. या कारवाईत ११० ग्रॅम वजनाचा एम.डी. (मेफेड्रोन) अंमली पदार्थ आणि मोटारसायकल असा सुमारे २२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पुणे ग्रामीण पोलिसांकडून ‘नशामुक्त भारत’ आणि ‘ड्रग्स फ्री महाराष्ट्र’ अभियानांतर्गत अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात कारवाई सुरू आहे. पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेची पथके अवैध व्यवसायांवर लक्ष ठेवून आहेत.
दरम्यान, १८ ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शिरूर परिसरात गस्त घालत असताना गोपनीय बातमीदारामार्फत दोन व्यक्ती एम.डी. अंमली पदार्थ विक्रीसाठी मलठण गावातील राजवाडा चेक परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आणि पंचांसह संयुक्त पथकाने मध्यरात्री सुमारे १२.१० वाजता छापा टाकला.
या कारवाईत सुरेंदरसिंह भैरुसिंह राठोड ऊर्फ राजपूत (वय २४) आणि श्रवण तेजाराम बिष्णोई (वय ३१) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून ११० ग्रॅम प्रतिबंधित एम.डी. अंमली पदार्थ आणि मोटारसायकल असा एकूण सुमारे २२ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ७४४/२०२६, एनडीपीएस कायदा कलम ८(क) व २२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरूर पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भासले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील तसेच स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांच्या पथकाने केली.
