‘इंडस्ट्रियल ग्रीव्हन्स सेल’ची स्थापना; उद्योजकांसाठी विशेष हेल्पलाईन सुरू
पुणे,द.म्हाळुंगे, दि. ६ ऑगस्ट : चाकण-महाळुंगे एमआयडीसी परिसरातील उद्योगांच्या समस्या, वाहतूक कोंडी, कामगार प्रश्न, सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्था यावर प्रभावी तोडगा काढण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या पुढाकाराने उद्योजक प्रतिनिधी व विविध शासकीय विभागांची संयुक्त समन्वय बैठक मर्सिडीज कंपनी, दक्षिण महाळुंगे एमआयडीसी येथे आयोजित करण्यात आली.
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या संकल्पनेतून व अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस दक्षिण महाळुंगे, उत्तर महाळुंगे, चाकण दक्षिण आणि चाकण उत्तर या चारही पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील प्रमुख औद्योगिक कंपन्यांचे प्लांट हेड व प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीत महाळुंगे एमआयडीसी परिसरातील वाहतूक कोंडी, पुणे-नाशिक, चाकण-तळेगाव आणि चाकण-शिक्रापूर महामार्गावरील वाहतूक व्यवस्थापनासाठी विशेष ट्रॅफिक नियोजन, उद्योग व पोलीस विभागातील समन्वय, कंपन्यांतील कामगार प्रश्न, औद्योगिक सुरक्षेच्या उपाययोजना, उद्योजक व कामगारांमध्ये सुरक्षित वातावरण निर्माण करणे तसेच कायदा व सुव्यवस्था या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी पोलीस आयुक्त चौबे यांनी एमआयडीसी परिसरातील उद्योग, उद्योजक, कामगार आणि माथाडी कामगारांच्या तक्रारी व गुन्ह्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी गुन्हे शाखेअंतर्गत ‘इंडस्ट्रियल ग्रीव्हन्स सेल’ स्थापन करण्यात आल्याची घोषणा केली. या सेलसाठी ७५१७७५१७९३ आणि ९०२९६३३४५२ हे हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आले असून, उद्योग क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी पोलीस प्रशासन कायम उद्योजक आणि कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
या बैठकीस अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड, एमआयडीसीचे अधीक्षक अभियंता मोंडवे, सहायक कामगार आयुक्त मुकुंद होने, एमएसईबीचे केशव कालुमाळी, पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, मारुती जगताप, विक्रांत देशमुख, सहायक पोलीस आयुक्त प्रिया डमाळे, सहायक पोलीस आयुक्त (इंडस्ट्रियल ग्रीव्हन्स सेल) सुदर्शन राठोड, सहायक पोलीस आयुक्त गुलाब इमानदार तसेच दक्षिण व उत्तर महाळुंगे एमआयडीसी, चाकण दक्षिण व चाकण उत्तर पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि सुमारे ५० ते ६० उद्योजक प्रतिनिधी उपस्थित होते.
