शहराच्या पाणीपुरवठ्याला बाधा न आणता विकासकामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याचे आश्वासन
पिंपरी, दि. ६ ऑगस्ट : पिंपरी-चिंचवड शहराच्या भविष्यातील पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या भामा-आसखेड जलवाहिनी प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर शिवे–वाकी तर्फे वाडा येथील प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने महापौर रवि लांडगे यांची भेट घेऊन गावातील प्रलंबित विकासकामे आणि प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रश्नांबाबत सविस्तर निवेदन सादर केले.
बैठकीत ग्रामस्थांनी भामा-आसखेड प्रकल्पासाठी दिलेल्या सहकार्याची आठवण करून देत गावातील पाणीपुरवठा, जलवाहिनीची प्रलंबित कामे, अंतर्गत रस्ते व त्यांचे काँक्रिटीकरण, वीजपुरवठा, सांडपाणी व गटार व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, स्मशानभूमीचे सुशोभीकरण, मंदिर परिसरातील सुविधा, सभागृह, खेळाचे मैदान, वृक्षारोपण आदी मूलभूत विकासकामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली. तसेच प्रकल्पामुळे बाधित झालेल्या ग्रामस्थांच्या प्रलंबित प्रश्नांवर महापालिका प्रशासनाने आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणीही करण्यात आली.
महापौर रवि लांडगे यांनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत संबंधित विषयांचा सविस्तर आढावा घेतला. प्रत्येक मागणीची वस्तुनिष्ठ माहिती घेऊन संबंधित विभागांना आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य मागण्या आणि गावाच्या विकासकामांबाबत सकारात्मक भूमिका घेत टप्प्याटप्प्याने कार्यवाही करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.
यावेळी महापौर रवि लांडगे म्हणाले की, “भामा-आसखेड प्रकल्प हा पिंपरी-चिंचवड शहराच्या भविष्यातील पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. शहराच्या पाणीपुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही, याची काळजी घेत प्रकल्प पूर्ण केला जाईल. त्याचबरोबर प्रकल्पासाठी सहकार्य केलेल्या ग्रामस्थांच्या न्याय्य मागण्या आणि गावाच्या विकासकामांनाही प्राधान्य देत संबंधित विभागांशी समन्वय साधून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल.”
बैठकीत संबंधित विभागांशी समन्वय साधून ग्रामस्थांच्या विविध मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यावर भर देण्यात आला. गावातील प्रलंबित विकासकामे तसेच प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांचे प्राधान्याने आणि टप्प्याटप्प्याने निराकरण करण्यासाठी महापालिका प्रशासन आवश्यक कार्यवाही करणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
बैठकीस आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, संबंधित विभागांचे अधिकारी तसेच शिवे–वाकी तर्फे वाडा येथील पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
