‘जस्टिस फॉरवर्ड २०२६’ परिषदेत कायदेशीर मदतीच्या बळकटीकरणावर भर
पिंपरी, दि. १७ जुलै : आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि न्यायापासून वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी वकिलांनी स्वातंत्र्यसैनिक व विधिज्ञ देशभक्त चित्तरंजन दास यांच्या कार्याचा आदर्श अंगीकारून समाजासाठी काम करावे, असे आवाहन केंद्रीय कायदा व न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी केले.
मुंबईतील चर्चगेट येथील बहाई सेंटर, कोर्ट चेंबर येथे ‘दर्द से हमदर्द तक ट्रस्ट’, ‘सुप्रा लीगल फाउंडेशन’ आणि ‘रिनोव्हेट इंडिया’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘जस्टिस फॉरवर्ड २०२६’ परिषदेत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी महाराष्ट्राचे कौशल्य विकासमंत्री मंगल प्रभात लोढा, भारत सरकारचे डेप्युटी सॉलिसिटर जनरल ॲड. प्रवीण फलदेसाई, ॲडिशनल सॉलिसिटर जनरल ॲड. अनिल सिंग, दर्द से हमदर्द तक ट्रस्टचे सचिव ॲड. प्रकाश साळसिंगीकर, सुप्रा लीगल फाउंडेशनच्या संचालिका ॲड. सुनीता खंडाळे-साळसिंगीकर, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. सतीश गोरडे, प्रथमेश रावराणे आणि ॲड. रवींद्र लोखंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मेघवाल म्हणाले, “आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांविषयी सहानुभूती व्यक्त करणारे अनेक असतात; मात्र न्यायापासून वंचित कैद्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रत्यक्ष काम करणाऱ्या ‘दर्द से हमदर्द तक ट्रस्ट’चे कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात महर्षी अरविंद घोष यांच्या खटल्यात देशभक्त चित्तरंजन दास यांनी स्वतःहून वकिली करत त्यांची निर्दोष मुक्तता घडवून आणली. त्यामुळे अरविंद घोष यांना राष्ट्रसेवेसाठी मोठे योगदान देता आले. आजच्या पिढीतील वकिलांनीही त्याच ध्येयाने कार्य केले पाहिजे.”
परिषदेच्या प्रास्ताविकात ॲड. प्रकाश साळसिंगीकर यांनी कायदेशीर मदत व्यवस्थेचे बळकटीकरण आणि भावी वकिलांचे सक्षमीकरण हा परिषदेचा प्रमुख उद्देश असल्याचे सांगितले.
या वेळी विधी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या **’लीगल एड चॅम्पियन्स’**चा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच लीगल एड, लीगल एड डिफेन्स कौन्सिल सिस्टीम (LADCS), एमएसएलएसए (MSLSA), डीएसएचटी (DSHT) आणि सुप्रा लीगल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचे प्रकाशनही करण्यात आले.
कार्यक्रमात मंगल प्रभात लोढा यांनी मनोगत व्यक्त केले. ॲड. रविरंजन यांनी सूत्रसंचालन केले, तर ॲड. रवींद्र लोखंडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या संयोजनासाठी ॲड. गणेश नागरगोजे, ॲड. ओंकार पाटील, ॲड. भूषण पाटील, ॲड. अशी नारायण, ॲड. विघ्नेश सुब्रमण्यम आणि ॲड. नितीन हजारे यांनी विशेष सहकार्य केले.
