सुरक्षित वाहनचालना, डिजिटल सक्षमीकरण आणि प्रवासी-केंद्रित सेवेसाठी महत्त्वपूर्ण पुढाकार
पुणे प्रतिनिधी : कॅस्ट्रॉल इंडिया लिमिटेड आणि सेनर्जी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक उत्तरदायित्व (CSR) उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘रोड सेफ्टी सारथी मित्र’ या उपक्रमाअंतर्गत पीएमपीएमएलच्या चालक सेवकांसाठी आयोजित प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात आणि यशस्वीरित्या पार पडत आहे. चालक सेवकांमध्ये सुरक्षित वाहनचालना, रस्ते सुरक्षा नियमांचे पालन, प्रवाशांप्रती संवेदनशीलता, उत्कृष्ट सेवा संस्कृती आणि अपघातमुक्त सार्वजनिक परिवहन व्यवस्था निर्माण करणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे.
प्रशिक्षणादरम्यान चालक सेवकांना सुरक्षित व जबाबदारीने वाहन चालविण्याचे महत्त्व, वाहतूक नियमांचे काटेकोर पालन, अपघात प्रतिबंधक उपाययोजना, मानसिक ताण-तणावाचे प्रभावी व्यवस्थापन तसेच शांत, संयमी आणि सकारात्मक दृष्टिकोनातून सेवा देण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यासोबतच प्रवाशांशी सौजन्यपूर्ण, आदरयुक्त आणि प्रभावी संवाद कसा साधावा, याबाबतही प्रशिक्षण देण्यात आले.
यावेळी चालक सेवकांना आयुष्मान भारत कार्ड, विविध शासकीय आरोग्य योजनांचा लाभ घेण्याची प्रक्रिया, डिजिटल पेमेंट, ऑनलाइन व्यवहार, सायबर सुरक्षितता, डिजिटल फसवणूक टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी तसेच आधुनिक डिजिटल सुविधांचा सुरक्षित वापर याविषयीही सखोल माहिती देण्यात आली.
हे प्रशिक्षण केवळ वाहनचालनेपुरते मर्यादित न ठेवता चालक सेवकांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासावर विशेष भर देण्यात आला. सहभागी चालक सेवकांचा उत्साह वाढविण्यासाठी त्यांना स्मृतिचिन्ह म्हणून टी-शर्ट प्रदान करण्यात आले. तसेच सर्व सहभागींसाठी चहा-नाश्ता व स्नेहभोजनाचीही उत्तम व्यवस्था करण्यात आली.
या उपक्रमाला चालक सेवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून प्रशिक्षणानंतर सहभागी चालक सेवकांनी सुरक्षित, शिस्तबद्ध, जबाबदार आणि प्रवासी-केंद्रित सेवा देण्याचा निर्धार व्यक्त केला.
कॅस्ट्रॉल इंडिया लिमिटेड आणि सेनर्जी संस्था यांच्या सामाजिक उत्तरदायित्व (CSR) उपक्रमातून राबविण्यात येणारा ‘रोड सेफ्टी सारथी मित्र’ हा उपक्रम सुरक्षित वाहनचालना, आरोग्य जागरूकता, डिजिटल सक्षमीकरण आणि उत्कृष्ट प्रवासी सेवा यांचा प्रभावी संगम ठरत आहे. अशा उपक्रमांमुळे चालक सेवकांचे कौशल्य अधिक सक्षम होऊन अपघातमुक्त, सुरक्षित आणि विश्वासार्ह सार्वजनिक परिवहन व्यवस्था उभारण्यास निश्चितच मोठी मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
