पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपरी, दि.२९ जून : २८ जून जागतिक पोलिओ लसीकरण दिनाचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागातर्फे राबविण्यात आलेल्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला रविवारी शहरभर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील ११२३ लसीकरण केंद्रांवर ० ते ५ वर्षे वयोगटातील तब्बल २ लाख २७ हजार ९५३ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्यात आले.
या मोहिमेचा शुभारंभ सांगवी येथील श्रीमती इंदिरा गांधी प्रसूती रुग्णालयात आमदार शंकर जगताप, आकुर्डी येथील ह.भ.प. मल्हारराव कुटे रुग्णालयात उपमहापौर शर्मिला बाबर तसेच तालेरा रुग्णालयात आमदार उमा खापरे, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे आणि विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या हस्ते करण्यात आला. भोसरी रुग्णालय, वायसीएम रुग्णालय आणि महापालिकेच्या इतर रुग्णालये व दवाखान्यांमध्येही मान्यवरांच्या उपस्थितीत मोहिमेचा प्रारंभ झाला.
महापालिकेची रुग्णालये, दवाखाने, अंगणवाडी केंद्रे, बसस्थानके, रेल्वे स्थानके, मेट्रो स्थानके तसेच फिरत्या लसीकरण केंद्रांवर दिवसभर लसीकरण करण्यात आले. या मोहिमेत ० ते ५ वर्षांखालील २,२७,९५३ बालकांसह ५ वर्षांवरील ३,६८३ बालकांनाही पोलिओ प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले.
मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी ८ विभागीय प्रभारी वैद्यकीय अधिकारी, ९५ वैद्यकीय अधिकारी, ३१९ पर्यवेक्षक आणि ४,५५२ लसीकरण कर्मचारी कार्यरत होते. याशिवाय एएनएम, एमपीडब्ल्यू, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी, महिला आरोग्य समिती सदस्य, रोटरी क्लबचे स्वयंसेवक आणि स्वयंसेवी संस्थांनीही सक्रिय सहभाग नोंदविला.
अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी प्रत्येक पालकाने आपल्या ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकाला पोलिओचे दोन थेंब देणे अत्यावश्यक असल्याचे सांगत, ज्या बालकांचे रविवारी लसीकरण झाले नाही त्यांना २९ जून ते ३ जुलैदरम्यान घरभेटी देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांकडून लस देऊन घ्यावी, असे आवाहन केले.
आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनीही शहरातील एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी महापालिकेने व्यापक नियोजन केले असून नागरिकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.
