बावधन परिसरातून दोघांना अटक; आर्म्स ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल, आरोपींवर यापूर्वीही गंभीर गुन्ह्यांची नोंद
पिंपरी-चिंचवड : अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांविरोधात सुरू असलेल्या विशेष ‘आर्म ड्राइव्ह’ मोहिमेत गुन्हे शाखा, युनिट-२ ने उल्लेखनीय कामगिरी करत रेकॉर्डवरील दोन सराईत आरोपींना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून तीन पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या आदेशानुसार शहरात अवैध शस्त्रांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड व सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-१) डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.
पोलीस शिपाई रवी पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे चांदणी चौक, बावधन परिसरात सापळा रचण्यात आला. त्यामध्ये आर्यन प्रकाश जाधव (वय २०, रा. बावधन) आणि ओमकार सचिन मोरे (वय २३, रा. कोथरुड) यांना २४ जून २०२६ रोजी ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या झडतीदरम्यान तीन पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
या प्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २६६/२०२६ अन्वये आर्म्स ॲक्ट कलम ३(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) सह १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास गुन्हे शाखा, युनिट-२ करत आहे.
दरम्यान, अटक करण्यात आलेला आरोपी ओमकार सचिन मोरे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध यापूर्वी चंदननगर, सिंहगड रोड आणि कोथरुड पोलीस ठाण्यांत आर्म्स अॅक्ट, अपहरण, मारहाण, दंगल आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त (गुन्हे) रोहिदास पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-१) डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार व गुन्हे शाखा, युनिट-२च्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
