वाल्हे, दि. २५ जून: कामठावाडी येथील अविष्कार उल्का विलास दुर्गाडे याने ‘Hack for Bharat, Build for the World (AI Model)’ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले. या स्पर्धेत मिळालेली रु. ५१ हजारांची बक्षीस रक्कम अविष्कारने कामठावाडी येथील श्री कानिफनाथ चरणी देणगी स्वरूपात अर्पण करून आपल्या यशाला सामाजिक व धार्मिक बांधिलकीची जोड दिली आहे.
अविष्कारच्या या यशस्वी कामगिरीबरोबरच त्याने दाखविलेल्या उदात्त भावनेचे सर्वत्र कौतुक होत आहे. राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून गावाचे नाव उंचावणाऱ्या अविष्कारने मिळालेली संपूर्ण बक्षीस रक्कम देवस्थानासाठी अर्पण केल्याने त्याच्या संस्कारशील आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्त्वाची प्रचिती आली.
या उल्लेखनीय यशाबद्दल आणि प्रेरणादायी कृतीबद्दल अविष्कार दुर्गाडे याचा आमचे प्रेरणास्थान व मार्गदर्शक डॉ. प्रा. दिगंबर गणपत दुर्गाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी अविष्कारच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत, भविष्यातही तो अशाच प्रकारे यशाची नवी शिखरे सर करेल, असा विश्वास व्यक्त केला.
अविष्कार दुर्गाडेच्या या यशामुळे कामठावाडी परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, त्याच्या या कार्याचा युवा पिढीसमोर आदर्श निर्माण झाला आहे. परिश्रम, गुणवत्ता आणि संस्कार यांच्या बळावर यश संपादन करून त्या यशाचे समाजोपयोगी रूपांतर कसे करावे, याचे उत्तम उदाहरण अविष्कारने घालून दिले आहे.
