शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा वाढता ताण कमी करण्याची नगरसेविका ऐश्वर्या तरस यांची आयुक्तांकडे मागणी
पिंपरी, दि. २३ जून २०२६ :पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये स्वतंत्र डेटा ऑपरेटरची तातडीने नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. शाळांमधील वाढत्या संगणकीकृत प्रशासकीय कामकाजामुळे शिक्षकांवर अतिरिक्त अशैक्षणिक जबाबदाऱ्यांचा ताण पडत असून, त्याचा प्रतिकूल परिणाम अध्यापनावर आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होत असल्याची बाब त्यांनी निवेदनात अधोरेखित केली आहे.
महापालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांची वैयक्तिक व शैक्षणिक माहिती, शासकीय योजनांशी संबंधित नोंदी, विविध ऑनलाइन पोर्टलवरील माहिती अद्ययावत करणे, उपस्थिती नोंदवही, परीक्षा व्यवस्थापन, अहवाल सादरीकरण तसेच इतर प्रशासकीय कामकाज मोठ्या प्रमाणावर संगणकीय पद्धतीने केले जाते. मात्र, अनेक शाळांमध्ये स्वतंत्र डेटा ऑपरेटरची व्यवस्था नसल्याने ही सर्व जबाबदारी शिक्षकांवरच येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यामुळे शिक्षकांचा अध्यापनासाठी उपलब्ध होणारा वेळ लक्षणीयरीत्या कमी होत असून, विद्यार्थ्यांना अपेक्षित शैक्षणिक मार्गदर्शन देण्यात अडथळे निर्माण होत आहेत. परिणामी, शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता वाढत असल्याची चिंता नगरसेविका तरस यांनी व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने सर्व शाळांमध्ये स्वतंत्र डेटा ऑपरेटर नेमावेत, विद्यार्थीसंख्या आणि कामकाजाचा ताण लक्षात घेऊन आवश्यक त्या ठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, ऑनलाइन व डिजिटल कामकाजासाठी आवश्यक तांत्रिक सुविधा वाढवाव्यात, तसेच शिक्षकांवरील अशैक्षणिक जबाबदाऱ्यांचे ओझे कमी करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
तसेच, डिजिटल शिक्षण व ई-लर्निंगशी संबंधित कामकाज अधिक कार्यक्षम, वेगवान आणि परिणामकारक करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करावी, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित जपले जावे आणि शाळांचे प्रशासकीय कामकाज अधिक सुरळीत व्हावे, यासाठी प्रशासनाने याबाबत सकारात्मक व तातडीचा निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा नगरसेविका ऐश्वर्या तरस यांनी व्यक्त केली आहे.
