उड्डाणपुलाच्या कामामुळे पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
पुणे, दि.२० जून : कात्रज चौक ते राजस सोसायटीदरम्यान सुरू असलेल्या सहापदरी उड्डाणपुलाच्या कामासाठी ‘सेगमेंट लाँचिंग’ प्रक्रिया सुरू करण्यात आल्याने कात्रज-कोंढवा मार्गावरील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. आजपासून पुढील आदेशापर्यंत ही वाहतूक योजना लागू राहणार असून अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता इतर वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पुणे वाहतूक पोलिसांनी केले आहे.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि उड्डाणपुलाचे काम सुरक्षितपणे पूर्ण करण्यासाठी कोंढव्याकडून कात्रजकडे जाणाऱ्या वाहनांना राजस सोसायटी पुलाचा वापर टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या वाहनांनी शेजारील सर्व्हिस रस्त्याचा वापर करावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे. दुसरीकडे, राजस सोसायटी येथील पुलावरील वाहतूक केवळ कात्रज ते कोंढवा या दिशेने एकेरी स्वरूपात सुरू ठेवण्यात आली आहे.
कात्रज तलाव परिसरातून येणाऱ्या वाहनांनी राजस सोसायटी चौक किंवा कोंढव्याच्या दिशेने जाण्यासाठी डावीकडे वळून सर्व्हिस रस्त्याचा वापर करावा. त्यानंतर वळसा घेऊन पुलामार्गे पुढील प्रवास करावा, असे नियोजन करण्यात आले आहे. तसेच राजस सोसायटीकडून कात्रजच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांनी कपिला डेअरीजवळील यू-टर्नचा वापर करून पुढे जावे, असेही वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी नागरिकांना वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. उड्डाणपुलाचे काम वेळेत आणि सुरक्षितपणे पूर्ण होण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, कात्रज-कोंढवा रस्त्यावरील महत्त्वाकांक्षी उड्डाणपुलाचे काम वेगाने सुरू असून, पुढील काही दिवस या परिसरातील वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वाहनचालकांनी प्रवासाचे नियोजन करून पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
