सभामंडप कोसळून ७ भाविकांचा मृत्यू; २५ जण जखमी, प्रशासनाचे युद्धपातळीवर बचावकार्य
परभणी, दि.२० जून : परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील यशवाडी येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरात शनिवारी भीषण दुर्घटना घडली. मंदिर परिसरातील सभामंडप अचानक कोसळल्याने दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत सुरुवातीला ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती; मात्र बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर एकूण ३२ जणांना मलब्यातून बाहेर काढण्यात आले असून त्यापैकी ७ जणांचा मृत्यू, तर २५ जण जखमी झाल्याची अधिकृत माहिती प्रशासनाने दिली.
शनिवार असल्याने यशवाडी येथील हनुमान मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. याच वेळी मंदिर परिसरातील सभामंडपाचा भाग अचानक कोसळल्याने अनेक जण मलब्याखाली अडकले. सुरुवातीला २० ते ३० जण अडकल्याची माहिती मिळत होती. घटनेची माहिती मिळताच प्रशासन, पोलीस, आरोग्य विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. अनेक अॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल करण्यात आल्या.
या बचावकार्यात आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, अग्निशमन विभाग पाथरी, मानवत येथील सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा आरोग्य अधिकारी, वैद्यकीय पथक, महापालिका प्रशासन तसेच स्थानिक ग्रामस्थांनी मोठे सहकार्य केले. मलबा हटवून अडकलेल्या सर्वांना बाहेर काढण्यात आले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले असून काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. जिल्हाधिकारी संजय चव्हाण, उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण आणि तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी घटनास्थळी उपस्थित राहून बचावकार्यावर लक्ष ठेवले.
दरम्यान, पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनीही तातडीने सर्व यंत्रणा घटनास्थळी पाठवून मदतकार्याचा आढावा घेतला. प्राथमिक माहितीनुसार, सभामंडपाचे बांधकामाचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडल्याचे समोर येत आहे. त्यामुळे बांधकामातील निष्काळजीपणा, सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव किंवा तांत्रिक त्रुटी याबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणीही होत आहे.
या भीषण दुर्घटनेमुळे यशवाडीसह संपूर्ण परभणी जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. मंदिरात दर्शनासाठी आलेल्या निष्पाप भाविकांवर काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्रशासनाकडून जखमींवर उपचार सुरू असून, दुर्घटनेचे नेमके कारण शोधण्यासाठी तपासाची चक्रे फिरू लागली आहेत.
