मठवाडी शाळेच्या इमारत दुरुस्ती व क्रीडांगण विकासासाठी निधी देणार
पुरंदर (मठवाडी), दि. १५ जून : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मठवाडी येथे शालेय प्रवेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात पुणे जिल्हा परिषद सदस्य अजय इंगळे यांच्या हस्ते नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व गणवेशांचे वाटप करण्यात आले.
बेलसर येथील उद्योजक विलासभाऊ गरुड यांच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व दप्तरांचे वितरण करण्यात आले. यावेळी अजय इंगळे यांनी शाळेच्या इमारतीच्या दुरुस्तीसह क्रीडांगण विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली.
“जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षण मिळते. विविध उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक, सामाजिक आणि बौद्धिक विकास घडतो. मठवाडी शाळा अष्टपैलू विद्यार्थी घडविण्याचे उत्कृष्ट कार्य करत आहे,” असे प्रतिपादन अजय इंगळे यांनी केले.
शाळेच्या विकासासाठी सामाजिक व दानशूर व्यक्तींनीही सहकार्याचे आश्वासन दिले. बेलसरचे तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश बुधे यांनी शालेय कमानीसाठी, तर विलासभाऊ गरुड यांनी बहुउद्देशीय स्टेजसाठी निधी देण्याची घोषणा केली.
विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी शाळेच्या परिसरातील भिंतींवर ऐतिहासिक तैलचित्रे रेखाटण्याच्या उपक्रमालाही विविध मान्यवरांनी पाठिंबा दर्शविला. यामध्ये निलेश जगताप, संभाजीबापू गरुड, धीरज जगताप, कैलास जगताप, सचिन फंड, शहाजी गरुड आणि स्वप्निल जगताप यांनी निधी देण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमात अजय इंगळे, निलेश जगताप, कैलास जगताप, शहाजी गरुड, संजयबापू गरुड आणि विलासभाऊ गरुड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा रजनी कुंभार, समिती सदस्य, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका उल्का दुर्गाडे यांनी केले, तर प्रास्ताविक व नियोजन मुख्याध्यापक विलास दुर्गाडे यांनी केले. शाळेच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या सर्व देणगीदारांचे शाळेच्या वतीने आभार मानण्यात आले.
