पिंपरी : शिवशाही शासन पक्ष संलग्न शिवशाही तृतीयपंथी भगिनी आघाडीच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी समीरा सुनील राजगुरू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तृतीयपंथी समाजाच्या हक्कांसाठी आणि विविध सामाजिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे.
तृतीयपंथी समाजाला सन्मान, रोजगार, आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक सुरक्षा मिळवून देण्यासाठी शिवशाही शासन पक्ष कटिबद्ध असल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले. समीरा राजगुरू यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील तृतीयपंथी भगिनींच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवून ‘घर, रेशन, ओळखपत्र आणि आरोग्य’ या मूलभूत हक्कांसाठी प्रभावीपणे काम करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
यावेळी शिवशाही शासन पक्षाचे प्रदेश प्रमुख कृष्णा साबळे, उपप्रमुख मंगेश डाखोरे, सोशल मीडिया प्रमुख आकाश घोलप, पिंपरी-चिंचवड शहर प्रमुख शिवाजी खडसे, महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा उषामाई कांबळे, शहर अध्यक्षा अनिता वैरागळ, तृतीयपंथी भगिनी आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा अर्चना शिंदे तसेच क्रांतिवीर बापूबिरू वाटेगावकर धनगर समाजाचे नेते सोमनाथ काळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, शिवशाही व्यापारी संघाचे अध्यक्ष व शिवशाही शासन पक्षाचे संस्थापक प्रमुख युवराज भगवान दाखले यांनी समीरा राजगुरू यांच्या नियुक्तीबद्दल समाधान व्यक्त केले. समाजासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या आणि निर्भीड भूमिका मांडणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख असून त्यांच्या नेतृत्वामुळे आघाडीला नवी ऊर्जा आणि दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक न्यायाच्या विचारांना अनुसरून बहुजन आणि तृतीयपंथी समाजाच्या एकतेसाठी ही आघाडी कार्यरत राहील, असेही यावेळी नमूद करण्यात आले.
