पिंपरी, : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २७ वा वर्धापन दिन पिंपरी येथील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. खराळवाडी येथील शहर (जिल्हा) मध्यवर्ती कार्यालयाच्या प्रांगणात शहराध्यक्ष योगेश मंगलसेन बहल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला आघाडीच्या प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर झालेल्या कार्यक्रमात शहराध्यक्ष योगेश बहल यांनी पक्षाच्या स्थापनेपासूनच्या वाटचालीचा आढावा घेत कार्यकर्त्यांच्या योगदानाचे कौतुक केले. पक्षाची विचारधारा अधिक व्यापकपणे जनतेपर्यंत पोहोचवून संघटना बळकट करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त करत पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी आणि जनसेवेसाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला. पक्षाच्या नेतृत्वाखाली विकासाभिमुख आणि लोकाभिमुख कार्य अधिक वेगाने पुढे नेण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलच्या शहर कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. त्यानुसार नजीर पटेल यांची मुख्य सचिवपदी, गुलामअली भालदार यांची शहर मुख्य संघटकपदी, तर मंगेश थिटे यांची शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
या कार्यक्रमास माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, शहर महिला अध्यक्षा कविता आल्हाट, कार्याध्यक्ष विजय लोखंडे, युवक अध्यक्ष शेखर काटे, कैलास बारणे, पंकज भालेकर, विविध महिला पदाधिकारी, प्रदेश पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे संयोजन सेवादल अध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ माऊली मोरे आणि सेवादलच्या पदाधिकाऱ्यांनी केले.
