पुणे, : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पुणे शहरातील चार प्रमुख एसटी स्थानकांवर प्लास्टिक बाटली पुनर्वापर (रिसायकलिंग) मशीनच्या लोकार्पण व हस्तांतरणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संरक्षण आणि प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाला प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमांतर्गत एकूण ८ रिसायकलिंग मशीन नागरिकांच्या सेवेत दाखल करण्यात आल्या.
स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन आणि वल्लभनगर (चिंचवड) या चार एसटी स्थानकांवर प्रत्येकी दोन अशा एकूण आठ मशीन बसविण्यात आल्या आहेत. या मशीनद्वारे प्लास्टिक बाटल्यांचे संकलन व पुनर्वापर सुलभ होणार असून स्वच्छ आणि हरित पुणे घडविण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
हा पर्यावरणपूरक प्रकल्प रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या पुढाकाराने साकारण्यात आला असून, Sensata Technologies Pvt. Ltd. यांच्या CSR निधीतून सुमारे ₹३२.५४ लाख खर्च करून हा उपक्रम राबविण्यात आला आहे. प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी क्लबचे माजी अध्यक्ष रो. कमलेश कार्ले यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
लोकार्पण सोहळ्यास एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक अरुण सिया, विभागीय परिवहन अधिकारी कमलेश धनरोळे, वरिष्ठ आगार व्यवस्थापक संजय बा. वाळवे, कामगार कल्याण अधिकारी सचिन भुजबळ तसेच सेन्साटा टेक्नॉलॉजीजचे डॉ. अजित बारबडेकर, अपर्णा दिवेकर, राजेश मदभावी आणि CSR टीमचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडेचे अध्यक्ष रो. श्रीशैल मेंथे, उपाध्यक्ष रो. प्रमोद दाभाडे, सचिव रो. प्रसाद मुंगी, CSR संचालक रो. चेतन नामजोशी यांच्यासह अनेक पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण कमी करणे, पुनर्वापर संस्कृतीला चालना देणे आणि नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. या मशीनमुळे सार्वजनिक ठिकाणी प्लास्टिक बाटल्यांची विल्हेवाट अधिक शास्त्रोक्त पद्धतीने लावली जाणार असून पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीला नवे बळ मिळणार आहे
