“अनधिकृत बांधकामांवर समान निकषाने कारवाई करा, विशिष्ट समाजाला लक्ष्य करू नका” – अर्शद खान
पिंपरी-चिंचवड, दि. ८ जून २०२६ (प्रतिनिधी): चिखली-कुदळवाडी परिसरातील अतिक्रमण व अनधिकृत बांधकामांवरील कारवाई पारदर्शक, न्याय्य आणि कायद्याच्या चौकटीत व्हावी, तसेच कोणत्याही विशिष्ट समाजाला लक्ष्य करून कारवाई केली जाऊ नये, अशी मागणी अर्शद अस्लम खान आणि परिसरातील रहिवाशांनी महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी तसेच अतिरिक्त आयुक्त (अतिक्रमण विभाग) तृप्ती सांडभोर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
रहिवाशांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील इतर भागांतील अनेक अनधिकृत बांधकामांना दंड आकारून नियमित करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर चिखली-कुदळवाडीतील रहिवाशांनाही नियमितीकरणाची संधी देण्यात यावी. अनेक कुटुंबे या परिसरात वर्षानुवर्षे वास्तव्यास असूनही त्यांना पाणीपुरवठा, मलनिस्सारण यांसारख्या मूलभूत नागरी सुविधांचा लाभ अद्याप मिळालेला नाही.
निवेदनानुसार, १० एप्रिल २०२६ रोजी झालेल्या अतिक्रमण कारवाईत प्रार्थनास्थळ, दुकाने, लघुउद्योग आणि राहती घरे पाडण्यात आली. या कारवाईनंतर परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षितता आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.
यावेळी अर्शद खान यांनी सांगितले की, मुस्लिम समाजबांधव अनधिकृत बांधकामांचे नियमितीकरण करण्यास तयार आहेत. त्यामुळे संबंधितांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याची संधी देऊन नियोजित अतिरिक्त कारवाई तात्पुरती स्थगित करण्यात यावी. महापालिकेने कोणताही दुजाभाव न करता सर्व अनधिकृत बांधकामांवर समान निकषांनुसार कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
रहिवाशांनी प्रशासनाकडून न्याय्य, पारदर्शक आणि सर्वसमावेशक निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली असून, नियमितीकरणाच्या प्रक्रियेसाठी सकारात्मक भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे.
