सिग्मा चौकात ५० लिटर गावठी दारू जप्त; महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल
महाळुंगे, ता. खेड (प्रतिनिधी) : महाळुंगे परिसरातील सिग्मा चौक येथे बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीवर दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी कारवाई करत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. मात्र पोलिसांची चाहूल लागताच संबंधित आरोपी घटनास्थळावरून फरार झाल्याने त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे.
दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४५५/२०२६ महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अन्वये नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. ३० मे) सायंकाळी सुमारे ५.२० वाजण्याच्या सुमारास सिग्मा चौक, महाळुंगे येथे करण्यात आली.
या प्रकरणी पोलीस शिपाई रविकिरण सूर्यकांत जगताप यांनी फिर्याद दिली असून दुरेश रमेश राठोड (वय ३३, रा. सिग्मा चौक, महाळुंगे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीररीत्या गावठी हातभट्टीची दारू विक्री करत होता. त्याच्याकडे सुमारे ५० लिटर गावठी दारू आढळून आली असून तिची किंमत अंदाजे पाच हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी कारवाईसाठी धाड टाकताच आरोपीने घटनास्थळावरून पलायन केले.
दरम्यान, परिसरात अवैध दारू विक्री व हातभट्टी व्यवसायाविरोधात पोलिसांनी मोहीम तीव्र केली असून फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके कार्यरत करण्यात आली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.
