पुणे…..खेड तालुक्यातील वासुली फाटा परिसरात किरकोळ कारणातून एका तरुणावर लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वासुली फाटा परिसरात उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४२६/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११७(२), ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २१ मे २०२६ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास फिर्यादी व त्यांचा मित्र ओम महाडीक हे हिरो होंडा स्लेंडर मोटारसायकलवरून वासुलीहून भांबोली गावाकडे जात होते. रस्त्याच्या कडेला भाजी खरेदीसाठी थांबले असताना आरोपी पंकज विजय कुमार याला फिर्यादीने अंगावर गाडी घातल्याचा संशय आला. त्यानंतर त्याने अमोल राऊत व एकनाथ राऊत यांना बोलावून घेत फिर्यादीला शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली.
यावेळी आरोपींनी फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच एका आरोपीने हातातील लाकडी दांडक्याने फिर्यादीच्या उजव्या हातावर व पायावर वार करून जखमी केले. दुसऱ्या आरोपीने बरगडीवर जोरदार मारहाण केल्याने फिर्यादीची बरगडी फ्रॅक्चर झाली. मारहाणीनंतर “पुन्हा आमच्या नादी लागू नको, नाहीतर खल्लास करू,” अशी धमकीही आरोपींनी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी पंकज विजय कुमार (मूळ रा. दिल्ली) याच्यासह अमोल राऊत व एकनाथ राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप आरोपी अटक नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास स.पो.फौ. जाधव करीत आहेत.