१० वर्षीय मुलीचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी
पिंपरी-चिंचवड : रावेत परिसरातील पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर निष्काळजीपणे रिव्हर्स घेतलेल्या पजेरो स्पोर्ट कारमुळे झालेल्या भीषण अपघातात १० वर्षीय मुलीचा मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी रावेत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना १९ मे २०२६ रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास पुणे-मुंबई हायवेवरील स्वामी हॉटेलसमोरील बापदेव महाराज ब्रिज परिसरात घडली. याप्रकरणी अमित बाळकृष्ण धावडे (वय ४७, रा. सारा कॉम्प्लेक्स सोसायटी, कसेली गाव, भिवंडी, जि. ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत यशवंत म्हात्रे (वय ४५, रा. वाशी, ता. पेन, जि. रायगड) हा त्याच्या ताब्यातील पजेरो स्पोर्ट कार (MH/43/AN/9567) निष्काळजीपणे चालवत होता. आरोपीने कोणताही पार्किंग सिग्नल न देता तसेच मागील बाजूने येणाऱ्या वाहनांना इशारा करण्यासाठी कोणालाही उभे न करता अचानक कार रिव्हर्स घेतली. त्यामुळे फिर्यादी यांच्या भावाची होंडा अॅक्टिव्हा (MH/05/DT/2832) कारला धडकली.
या अपघातात फिर्यादी यांचे भाऊ जयवंत यांच्या डोक्याला व चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली, तर वहिनी जयश्री यांच्या डोक्याला व डाव्या पायाला फ्रॅक्चर झाले. तसेच पुतणी कु. स्वरा (वय १० वर्षे ६ महिने) हिच्या डोक्याला व छातीला गंभीर दुखापत होऊन तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
अपघातात दोन्ही वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी रावेत पोलिसांनी बीएनएस कलम १०६(१), १२५(अ), १२५(ब), ३२४(४) तसेच मोटार वाहन कायदा कलम ११९/१७७ अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत.