पिंपरी-चिंचवड : हिंजवडी परिसरातील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची शेअर मार्केट व आयपीओमध्ये जास्त परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल ३५ लाख २८ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३२८/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० मधील कलम ६६ (सी), ६६ (डी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ३० मार्च २०२६ रोजी पहाटे १२.५६ वाजल्यापासून ते दि. २४ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ४.१४ वाजेपर्यंत हा प्रकार घडला. फिर्यादी हे मान, हिंजवडी येथील जॉयव्हिल शापुर्जी हौसींग प्रा. लि. कंपनीत काम करत होते.
आरोपी प्रतिमा बन्सल व मयांक सचान यांनी संगनमत करून विविध मोबाईल क्रमांक व व्हॉट्सॲपद्वारे फिर्यादीशी संपर्क साधला. त्यानंतर फिर्यादीला विविध इन्व्हेस्टमेंट ग्रुपमध्ये ॲड करून केवायसी अपडेट करण्यास सांगितले. तसेच ॲपवर सुरू असलेल्या शेअर मार्केट व आयपीओमध्ये मोठी गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले.
आरोपींनी विश्वास संपादन करून फिर्यादीकडून विविध बँक खात्यांमध्ये वेळोवेळी एकूण ३५ लाख २८ हजार रुपये जमा करून घेत फसवणूक केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर फिर्यादीने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पांचाळ करीत आहेत.