पुणे : प्रतिनिधी…दक्षिण म्हाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका कंपनीतील कर्मचाऱ्याने सहकाऱ्यावर हातोड्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार दि. २० मे २०२६ रोजी सकाळी ११.२२ वाजण्याच्या सुमारास मौजे निघोजे, ता. खेड, जि. पुणे येथील संदिप टेक्नॉलॉजी प्रा. लि. कंपनीत घडला. याप्रकरणी दि. २२ मे रोजी सकाळी १०.१८ वाजता दक्षिण म्हाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणातील आरोपी प्रविण ज्ञानेश्वर बोबडे (वय ३४, रा. देहुगाव, ता. हवेली, जि. पुणे, मूळ रा. पिंपळखुटा, ता. बाबुळगाव, जि. यवतमाळ) यास पोलिसांनी अटक केली आहे. फिर्यादी योगेश चंद्रकांत माने (रा. बेळगा, ता. उमरगा, जि. धाराशिव) यांनी याबाबत तक्रार दिली आहे.
फिर्यादी यांनी आरोपीला उशिरा कामावर आल्याबद्दल रागावल्याचा राग मनात धरून आरोपीने कंपनीतील केबिनमध्ये हातातील हातोड्याने फिर्यादीच्या डोक्याच्या मागील बाजूस वार केला. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले असून आरोपीने त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जायभाये करीत आहेत.