जालना : शहरातील बसस्थानक परिसरातील ‘न्यू शिवगंगा लॉज’वर पोलिसांनी शुक्रवारी (दि. २२) दुपारी धाड टाकून सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला. या कारवाईत सात पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून रोख रकमेसह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी लॉज मालकासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू आणि अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांना बसस्थानक रोडवरील न्यू शिवगंगा लॉजमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे प्रभारी अधिकारी पोउपनि योगेश चव्हाण आणि त्यांच्या पथकाने दुपारी सुमारे ३.३० वाजता लॉजवर छापा टाकला.
तपासात लॉज मालक संदीप पांडुरंग राऊत हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बाहेरून महिलांना आणून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचे समोर आले. कारवाईदरम्यान पोलिसांनी सात पीडित महिलांची सुटका केली. तसेच घटनास्थळावरून ७७ हजार ३८० रुपयांची रोख रक्कम आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाणे येथे अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ (PITA) अंतर्गत कलम ३, ४, ५ आणि ६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये लॉज मालक संदीप पांडुरंग राऊत आणि बाबुलाल रामदास भटकर हे फरार असून, हॉटेल व्यवस्थापक विलास शिवाजी भानुसे याच्यासह सहा ग्राहकांचा समावेश आहे.
अटकेतील ग्राहक आरोपींमध्ये गंगाधर रामराव सिरसाट (सिंधी पिंपळगाव), दिपक रामचंद्र थोरात (बोरी), चांगदेव दिलीप निटवे (सोलापूर, सध्या राजूर चौफुली), बाबासाहेब दामोदर शेवाळ (काजळा), तातेराव गोपीनाथ मगर (राममुर्ती) आणि भास्कर साहेबराव मोरे (सोयनदेव) यांचा समावेश आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोउपनि योगेश चव्हाण, रवी जोशी, संजय गवळी, महिला अंमलदार संगिता चव्हाण, पुष्पा खरटमल, आरती साबळे, रेणुका राठोड आणि चालक संजय कुलकर्णी यांनी ही कारवाई यशस्वी केली. पुढील तपास सदर बाजार पोलीस करीत आहेत.
