३४ कोटींचे हेरॉईन जप्त, मुख्य पुरवठादारासह पाच जण जेरबंद
कल्याण प्रतिनिधी…..पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०३, कल्याण यांच्या अंमली पदार्थ विरोधी कारवाई पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ९ किलो ७६८ ग्रॅम वजनाचा सुमारे ३४ कोटी १८ लाख ८४ हजार रुपये किमतीचा “हेरॉईन (गर्द)” अंमली पदार्थ जप्त केला असून मुख्य पुरवठादारासह पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.
दि. १ एप्रिल २०२६ रोजी महात्मा फुले चौक पोलीस ठाणे हद्दीत अंमली पदार्थ विक्रेते, डिलर तसेच फरारी आरोपींचा शोध घेण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी कारवाई पथक गस्त घालत होते. यावेळी सकाळी सुमारे ७.२० वाजण्याच्या सुमारास स्मशानभूमीजवळ सांगळेवाडी रोड, कल्याण पश्चिम येथे दोन संशयित इसम पाठीवर बॅगा घेऊन उभे असल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांनी चौकशीसाठी जवळ जाताच दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तत्काळ त्यांना ताब्यात घेतले.अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे कासिम अब्दुल सत्तार वसईकर (वय ३८, रा. शहापूर, ठाणे) आणि कृष्णा नागप्पा हळेमणी (वय ३६, रा. सायन कोळीवाडा, मुंबई) अशी आहेत.
दोघांची पंचांसमक्ष झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून ९ किलो २३६ ग्रॅम वजनाचे सुमारे ३२ कोटी ३२ लाख ६० हजार रुपये किमतीचे हेरॉईन आणि ३९ हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण ३२ कोटी ३२ लाख ९९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २२२/२०२६ अन्वये एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क), २२(क) आणि २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासादरम्यान आरोपी कासिम वसईकर यांच्या घराची झडती घेतली असता आणखी ५३१.६९ ग्रॅम वजनाचे १ कोटी ८५ लाख ८५ हजार रुपये किमतीचे हेरॉईन जप्त करण्यात आले.
पुढील सखोल तपासात जप्त केलेले हेरॉईन मुख्य पुरवठादार अमजद युसुफ पठाण याने गणेशन पुथुस्वामी जंगमार उर्फ अण्णा याला विक्रीसाठी पुरवल्याचे निष्पन्न झाले. तसेच कासिम वसईकर आणि त्याचा साथीदार सद्दाम गफुर शेख हे अमजद पठाण याच्याकडून अंमली पदार्थ व्यवसायिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत असल्याची माहिती तपासात समोर आली.
पोलिसांनी आरोपी गणेशन जंगमार याला ५ एप्रिल रोजी, तर सद्दाम शेख याला ६ एप्रिल रोजी अटक केली. दरम्यान, मुख्य आरोपी अमजद युसुफ पठाण याला २१ मे २०२६ रोजी अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला १ जून २०२६ पर्यंत दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.या गुन्ह्यात आतापर्यंत एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई परिमंडळ ३ कल्याण विशेष कारवाई पथक आणि महात्मा फुले चौक पोलीस ठाणे यांनी संयुक्तपणे केली. पोलीस आयुक्त श्री. आशुतोष डुंबरे, पोलीस सहआयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव, पोलीस उप आयुक्त अतुल झेंडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि अनिल गायकवाड,पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र ठोके आणि त्यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी पार पाडली.
