पिंपरी-चिंचवड : थेरगाव परिसरात जुन्या वादातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २१६/२०२६ अन्वये बीएनएस कलम १०९(१), ३५२, ३५१(२)(३), ३(५) तसेच शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ४(२५), ४(२७), ३५, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३)/१३५ आणि क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट कलम ३, ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना २१ मे २०२६ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास समर्थ क्लिनिकसमोर, जगतापनगर लेन क्रमांक ४ व ५, थेरगाव येथे घडली. याप्रकरणी सौरभ विलास चौधरी (वय २४, व्यवसाय सिक्युरिटी) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे आपल्या मित्रांसोबत परिसरात गप्पा मारत उभे असताना आरोपी गौरव ऊर्फ नन्या गौतम वाघमारे (वय २२) आणि रितेश क्षीरसागर (वय २१, दोघेही रा. आनंदनगर झोपडपट्टी, चिंचवड) हे एका अनोळखी साथीदारासह ॲक्सेस दुचाकीवर तेथे आले. यावेळी आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करत कोयत्याने हल्ला केला.
आरोपी गौरव वाघमारे याने फिर्यादीच्या डोक्यावर व उजव्या हाताच्या कोपराजवळ कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर आरोपी रितेश क्षीरसागर याने डाव्या हाताच्या कोपराजवळ वार केला, तर तिसऱ्या अनोळखी आरोपीने डाव्या हाताच्या पंजावर वार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
हल्ल्यानंतर आरोपींनी फिर्यादीच्या मित्रांनाही धमकावत परिसरात दहशत निर्माण केली. “आम्ही पिंपरी-चिंचवडचे भाई आहोत” असे म्हणत आरोपींनी हवेत कोयते फिरवून नागरिकांना धमकावल्याचेही समोर आले आहे.
या प्रकरणी काळेवाडी पोलिसांनी तातडीने कारवाई करत गौरव वाघमारे आणि रितेश क्षीरसागर यांना अटक केली असून तिसऱ्या फरार आरोपीचा शोध सुरू आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.