पिंपरी, दि. २९ जून २०२६ : मागासवर्गीय आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या नावाखाली समाजात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होत असून, यामुळे समाजात फूट पडण्याची भीती आहे. त्यामुळे आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला परिषदेचा ठाम विरोध असल्याचे मत माजी आमदार व ज्येष्ठ नेते ॲड. जयदेव गायकवाड यांनी व्यक्त केले.
चिंचवड येथे आयोजित आरक्षण उपवर्गीकरण विरोधी परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगरसेवक डॉ. सुहास कांबळे, ज्येष्ठ नेते मानव कांबळे, ॲड. विवेकभाई चव्हाण (कोब्रा), वसंतदादा साळवी, ॲड. अंबादास बनसोडे, प्रा. केशव वाघमारे, बाळासाहेब भागवत, देवेंद्र तायडे, कपिल सरोदे, ॲड. अरविंद तायडे, विवेक बनसोडे, सुरेश निकाळजे, बापू गायकवाड आदी उपस्थित होते.
ॲड. गायकवाड म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या प्रज्ञा, ज्ञान आणि संविधान निर्मितीच्या कार्यातून देशाच्या सामाजिक पुनर्रचनेचा पाया घातला. त्यापूर्वी महात्मा जोतीराव फुले यांनी शिक्षण आणि ज्ञानाचे महत्त्व समाजासमोर मांडले. समतेच्या तत्त्वावर राष्ट्राची उभारणी व्हावी आणि जातीय विषमता दूर व्हावी, हा महापुरुषांचा विचार होता. त्यामुळे जातींच्या पलीकडे जाऊन समाजाने विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारे मागासवर्गीय आरक्षणामध्ये उपवर्गीकरण आणि ‘क्रिमिलेयर’ची अट लागू करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा करत, त्यामुळे मागासवर्गीय समाजात मतभेद निर्माण होण्याची शक्यता असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली.
संविधानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘बॅकवर्ड’ (मागासवर्ग) या संज्ञेची निश्चित व्याख्या केलेली नाही. कारण प्रत्येक राज्यातील सामाजिक परिस्थितीनुसार मागासवर्गीय समाज वेगळा असू शकतो आणि त्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार संबंधित राज्य सरकारांना आहे. महाराष्ट्रात सध्या ५९ जाती मागासवर्गीय म्हणून नोंदविल्या गेल्या असून इतर राज्यांमध्ये ही संख्या आणि रचना वेगळी असू शकते. त्यामुळे केवळ एका जातीच्या मागणीवरून आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्यास आमचा विरोध असल्याचे ॲड. गायकवाड यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या आयोजनात ईश्वर कांबळे, ॲड. मिलिंद कांबळे, राहुल सोनवणे, नितीन कांबळे, प्रकाश बुक्तर, विनोद सरोदे, ॲड. नीलध्वज माने, प्रमोद क्षीरसागर, सुरेश गायकवाड आणि विकास साळवे यांनी पुढाकार घे तला.
