पिंपरी : चिंचवड स्टेशन परिसरातील जनता सहकारी बँकेसमोर सोनं सोडवून देण्याच्या बहाण्याने ५ लाख १० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुजितकुमार काकासो भोसले (वय ४०, रा. आंबेगाव पठार, पुणे) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार आरोपी प्रशांत मोहन गायकवाड (वय अंदाजे ३५, रा. खेड राजगुरूनगर, पुणे) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२), ३१८(४) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही घटना १५ मे २०२६ रोजी दुपारी साडेचार ते २० मे २०२६ रोजी रात्री आठ वाजेपर्यंत जनता सहकारी बँक, चिंचवड स्टेशनसमोर, उत्तम स्वीटजवळ घडली. आरोपीने फिर्यादी यांना बँकेत गहाण ठेवलेले ६० ग्रॅम सोने सोडवून देण्यासाठी ५ लाख १० हजार रुपये आणण्यास सांगितले. तसेच व्यवहाराचा लेखी करार करून विश्वास संपादन केला.
यानंतर आरोपीने फिर्यादींकडून संबंधित रक्कम स्वतःच्या जनता सहकारी बँकेतील खात्यावर जमा करून घेतली. मात्र गहाण ठेवलेले सोने न सोडविता आरोपी बँकेतून निघून गेला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी पोलिसांत धाव घेतली.
पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक केणे करीत आहेत.