लोणावळ्यात भाजपाचे प्रशिक्षण महाअभियान; विचारधारा, संघटनात्मक शिस्त आणि तंत्रज्ञानावर भर
पिंपरी : भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशभरात सुरू असलेल्या ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६’ अंतर्गत पिंपरी-चिंचवड शहर जिल्ह्याचा दोन दिवसीय भव्य प्रशिक्षण वर्ग लोणावळा येथे उत्साहात पार पडला. या निवासी प्रशिक्षण वर्गात पक्षाची विचारधारा, संघटनात्मक शिस्त, समाजाप्रती बांधिलकी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रशिक्षण वर्गात महाराष्ट्रातील विविध वरिष्ठ नेत्यांनी १२ विषयांवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील १५० हून अधिक पदाधिकाऱ्यांनी या महाअभियानात सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भारतमाता, डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी त्यांनी ‘शतप्रतिशत भाजपा’ हा विचार प्रत्येक घराघरात पोहोचवण्याचे आवाहन केले. देशात अनेक राजकीय पक्ष असले तरी सातत्याने कार्यरत राहणारा पक्ष म्हणजे भाजपा असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाचा सुवर्णकाळ सुरू असून कार्यकर्त्यांनी नागरिकांना ‘हवेहवेसे’ वाटतील असे काम करावे, असा सल्लाही त्यांनी दिला. सार्वजनिक जीवनात वावरताना पक्षाची प्रतिमा उंचावेल असेच आचरण ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रत्येक प्रामाणिक कार्यकर्त्याला संधी मिळाली पाहिजे, असेही ते म्हणाले.
उद्घाटनप्रसंगी महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा वाघ, प्रदेश मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, उमाताई खापरे, अमित गोरखे, अश्विनी जगताप, माजी खासदार अमर साबळे, संगठन सरचिटणीस ॲड. मोरेश्वर शेडगे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
पहिल्या दिवशी व्यावहारिक सत्र, वैचारिक अधिष्ठान, कार्य विस्तार, मीडिया व्यवस्थापन, कार्यपद्धती, देशासमोरील आव्हाने आणि कार्यकर्ता विकास या विषयांवर विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
दुसऱ्या दिवशी योगा व व्यायाम सत्रानंतर बूथ व्यवस्थापन, भाजपा इतिहास, मोदी सरकारच्या योजना, सोशल मीडिया, AI, नमो ॲप, सरल ॲप आणि विचार परिवार या विषयांवर कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्वाखाली या प्रशिक्षण वर्गाचे नियोजन संगठन सरचिटणीस ॲड. मोरेश्वर शेडगे यांनी केले. त्यांना मधुकर बच्चे, संजय परळीकर, संजय पटणी, भूषण जोशी, अमेय देशपांडे आणि सचिन राऊत यांनी सहकार्य केले.
या दोन दिवसीय प्रशिक्षण महाअभियानामुळे कार्यकर्त्यांना वैचारिक बळ मिळून संघटना अधिक सक्षम, शिस्तबद्ध आणि गतिमान होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
