‘क्षितिज २०२६’ अंतर्गत पीसीसीओईमध्ये पेटंटयोग्य नवकल्पनांचे सादरीकरण
पिंपरी, दि. १८ मे २०२६ : “२०४७ विकसित भारत” हे राष्ट्रीय ध्येय साध्य करण्यासाठी संशोधन आणि स्वदेशी नवोपक्रमांना मोठे महत्त्व असून, भारतीय अभियंत्यांनी आंतरविद्याशाखीय सहकार्याच्या माध्यमातून संशोधन क्षेत्रात अधिक सक्रियपणे योगदान द्यावे, असे आवाहन सीएसआयआर राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. हर्षवर्धन पोल यांनी केले.आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे ‘क्षितिज २०२६’ अंतर्गत आयोजित पाचव्या ‘इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट शोकेस कॉन्फरन्स’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, उपसंचालक डॉ. निळकंठ चोपडे, 3ds.com कंपनीचे ग्लोबल कोअर टीम लीडर अनिकेत भांगे, संयोजक डॉ. राहुल गुजर, डॉ. श्रीनिवास अंबाला, डॉ. रजनी पी. के. यांच्यासह राज्यभरातील विविध नामांकित कंपन्यांमधील १५५ उद्योग प्रतिनिधी उपस्थित होते.
परिषदेत संशोधकांनी उद्योगाभिमुख आणि पेटंटयोग्य अशा २६ नाविन्यपूर्ण प्रकल्पांचे सादरीकरण केले. यामध्ये मशीन लर्निंग, डेटा सायन्स, स्ट्रक्चरल हेल्थ मॉनिटरिंग, सस्टेनेबल एन्व्हायर्नमेंट, रोबोटिक्स अँड ऑटोमेशन, हेल्थकेअर, सिस्टीम इंजिनिअरिंग आणि स्मार्ट चिप यांसारख्या आंतरविद्याशाखीय क्षेत्रांचा समावेश होता.
यावेळी अनिकेत भांगे यांनी सांगितले की, संशोधनातून विकसित होणारी कोणतीही नवकल्पना प्रतिकूल नसते; मात्र तिचे परिणामकारक उत्पादनांमध्ये रूपांतर होणे अधिक महत्त्वाचे असते. ‘क्षितिज २०२६’ हे उपयोजित अभियांत्रिकी, वास्तविक समस्यांचे निराकरण आणि शाश्वत विकासासाठी एक प्रभावी व्यासपीठ ठरत असून, उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधील सहकार्य अधिक दृढ करण्यास मदत करेल, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे आयोजन पीसीईटी ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.स्वागत डॉ. रजनी पी. के. यांनी केले, सूत्रसंचालन डॉ. राहुल गुजर यांनी तर आभार डॉ. श्रीनिवास अंबाला यांनी मानले.
