पुणे दिं.१४ मे : पीएमपीएमएलच्या वतीने नागरिकांना कळविले आहे की, महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन यांच्या स्वारगेट ते कात्रज बीआरटी मार्गावरील सुरू असलेल्या मेट्रो कामामुळे या परिसरात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पीएमपीएमएलकडून काही बसमार्गांमध्ये तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.
पंचमी हॉटेल व भापकर पंप परिसरात स्वारगेटकडून कात्रजकडे तसेच कात्रजकडून स्वारगेटकडे जाणाऱ्या बसेस पूर्वीप्रमाणे बीआरटी मार्गातूनच धावणार आहेत.
अरण्येश्वर कॉर्नर व नातूबाग परिसरात मात्र दोन्ही दिशेने बससेवा सर्व्हिस रोडमार्गे वळविण्यात आली आहे.
तसेच पद्मावती, के.के. मार्केट, बालाजीनगर, भारती विद्यापीठ, कात्रज सर्पोद्यान आणि मोरे बाग परिसरात स्वारगेटहून कात्रजकडे जाणाऱ्या बसेस बीआरटी मार्गाने धावतील, तर कात्रजहून स्वारगेटकडे येणाऱ्या बसेस सर्व्हिस रोडचा वापर करतील.
दरम्यान, प्रवाशांच्या सोयीसाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना नॉन-बीआरटी बसथांब्यांची व्यवस्था करण्यात आली असून नागरिकांनी या बदलांची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन पीएमपीएमएल प्रशासनाने केले आहे.
