‘आपदा मित्र’ स्वयंसेवक नियुक्तीस हिरवा कंदील
पिंपरी चिंचवड, दि. १४ मे : पिंपरी चिंचवड महानगरपालिकाच्या विधी समितीच्या पाक्षिक सभेत महापालिकेच्या विविध विभागांतील भंगार साहित्याच्या ई-लिलावाचा प्रस्ताव अधिक तपशीलाअभावी तहकूब करण्यात आला. तर मान्सूनपूर्व तयारीसाठी ५० ‘आपदा मित्र स्वयंसेवक’ नियुक्त करण्याच्या प्रस्तावाला समितीने मंजुरी दिली.
महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात बुधवारी (दि. १३ मे) सकाळी ११ वाजता ही सभा पार पडली. सभेला विधी समितीचे सभापती, सदस्य तसेच नगरसचिव उपस्थित होते.
सभेत महापालिकेच्या विविध विभागांमध्ये साठवून ठेवण्यात आलेल्या जुन्या व फेरवापरास अयोग्य ठरलेल्या भंगार साहित्याच्या ई-लिलावाचा विषय चर्चेसाठी ठेवण्यात आला होता. “जेथे आहे, जसे आहे” या तत्वावर ई-लिलावाद्वारे विक्री करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने मांडला. या साहित्याचे मूल्यांकन ए. व्ही. शेवडे अँड असोसिएट्स यांनी केले असून अंदाजित विक्रीमूल्य १ कोटी ६ लाख २४ हजार ६०० रुपये इतके निश्चित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार एक लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या साहित्याचा ई-लिलाव करणे बंधनकारक आहे. मात्र, प्रस्तावात भंगार साहित्याचा सविस्तर तपशील नसल्याचे सदस्यांनी निदर्शनास आणून दिल्याने हा विषय तहकूब करण्यात आला.
दरम्यान, आगामी मान्सून काळात आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कामकाज अधिक सक्षम करण्यासाठी ५० प्रशिक्षित ‘आपदा मित्र स्वयंसेवक’ नियुक्त करण्याच्या प्रस्तावाला समितीने मंजुरी दिली. हे स्वयंसेवक राज्य अग्निशमन दल, नागरी संरक्षण दल किंवा शासनमान्य संस्थांकडून प्रशिक्षित असणार आहेत.
या स्वयंसेवकांची पाच महिन्यांसाठी मानधन तत्वावर नियुक्ती करण्यात येणार असून प्रत्येकाला दरमहा २२ हजार ४८५ रुपये मानधन दिले जाणार आहे. या उपक्रमासाठी एकूण ५६ लाख २१ हजार २५० रुपयांचा खर्च अपेक्षित असून तो “अस्थायी आस्थापना” या लेखाशिर्षातून करण्यात येणार आहे.
