पीडित परिवाराची सांत्वनपर भेट घेत दिला न्यायाचा ठाम शब्द; पोलीस अधीक्षकांशी थेट चर्चा, एसआयटीतील अधिकाऱ्यांना बदलण्याची मागणी आणि फास्टट्रॅक कोर्टात खटला चालविण्यासाठी पुढाकार!
वैजापूर प्रतिनिधी विजयकुमार मोकळे : रोहित अनिल पठारे यांच्या दुर्दैवी मृत्यूच्या पार्श्वभूमीवर आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी १६ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता वैजापूर येथे रोहित पठारे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांनी शोकाकुल कुटुंबीयांचे सांत्वन करून या कठीण प्रसंगी संपूर्ण आंबेडकरी चळवळ आणि संघटना पीडित कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभ्या असल्याचा विश्वास दिला.
आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर हे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तसेच समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.
यानंतर त्यांनी वैजापूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात जाऊन पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाला यांची भेट घेतली. रोहित पठारे प्रकरणातील तपासाची सद्यस्थिती, आरोपींना अटक करण्यासाठी करण्यात आलेली कारवाई आणि पुढील तपासाबाबत त्यांनी सविस्तर माहिती घेतली.
याप्रसंगी छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक प्रवीण जाधव यांच्याशीही त्यांनी दूरध्वनीवरून चर्चा केली. पोलिसांनी केलेल्या तपासाची आणि आरोपींना अटक करण्यासाठी केलेल्या कारवाईची माहिती ऐकल्यानंतर आदरणीय भीमराव आंबेडकर यांनी पोलिसांच्या कामाचे कौतुक केले. पोलिसांच्या कामगिरीबद्दल त्यांनी समाधानही व्यक्त केले.
मात्र, एसआयटीच्या तपासाबाबत स्थानिक नागरिकांकडून काही प्रश्न उपस्थित केले जात असल्याची बाबही त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. यावर त्यांनी पोलीस अधीक्षक प्रवीण जाधव यांच्याकडे एसआयटीमधील उपविभागीय पोलीस अधिकारी अविनाश फुंदे आणि पोलीस निरीक्षक भिवसने यांना बदलण्याची मागणी केली. स्थानिक नागरिकांमध्ये या अधिकाऱ्यांबाबत नाराजी असल्याने तपास प्रक्रियेवर जनतेचा विश्वास कायम राहण्यासाठी योग्य निर्णय घ्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.
या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा विलंब न करता लवकरात लवकर दोषारोपपत्र दाखल करावे आणि खटला फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणीही त्यांनी केली.
पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी मदत!
रोहित पठारे यांच्या कुटुंबीयांना आश्वस्त करताना आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर म्हणाले की, आरोपींना कायद्याच्या कचाट्यातून सुटू दिले जाणार नाही. पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत सर्वतोपरी कायदेशीर मदत केली जाईल. आवश्यकतेनुसार नामांकित वकिलांची मदतही उपलब्ध करून दिली जाईल. संपूर्ण संघटना आणि आंबेडकरी चळवळ या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असा विश्वास त्यांनी दिला.
२२ नोव्हेंबरच्या रास्ता रोको आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन!
येत्या २२ नोव्हेंबर २०२६ रोजी सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने समृद्धी महामार्गावरील घायगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनात समाजबांधवांनी, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी आणि न्यायप्रेमी नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी यावेळी केले.
अँड. भंडारे सर (भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष), अँड. राजारामजी बडगे, यू. जी. बोराडे (भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष), महासचिव अशोक केदारे, अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष शांताराम रणशूर, समता सैनिक दलाचे जिल्हा उपाध्यक्ष अतिश त्रिभुवन, गौतम पगारे, कवी विजय मोकळे, यशवंतराव पडवळ, प्रा. आबासाहेब कसबे, संजय बागुल, प्रल्हाद सातोरे, राजवीर त्रिभुवन, अँड. बागुल, अँड. महेंद्र सोनवणे यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, उपासक आणि उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रोहित पठारे यांना न्याय मिळालाच पाहिजे, या भूमिकेतून संपूर्ण आंबेडकरी समाज एकवटत असून पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहणार असल्याचा ठाम निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
