गुन्हे शाखा युनिट-३ची कारवाई; विद्युत डीपी चोरीचे सहा गुन्हे उघड, ५.९१ लाखांचा मुद्देमाल जप्त
पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विद्युत डीपीमधील तांब्याच्या तारा चोरी करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखा युनिट-३ने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत चार वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या पाहिजे आरोपीसह तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून विद्युत डीपी चोरीसाठी वापरण्यात येणारी हत्यारे, दुचाकी आणि चोरीच्या तांब्याच्या तारा असा एकूण ५ लाख ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विद्युत डीपी चोरीचे सहा गुन्हे उघडकीस आले असून, संबंधित गुन्ह्यांमधील चोरीला गेलेला १०० टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या ग्रामीण भागात दिघी, आळंदी आणि चाकण पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विद्युत डीपी चोरीच्या घटना घडल्या होत्या. या गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी आरोपींचा तातडीने शोध घेण्याच्या सूचना गुन्हे शाखा युनिट-३चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे आणि त्यांच्या पथकाला दिल्या होत्या.
त्यानुसार गुन्हे शाखेचे पथक समांतर तपास करीत होते. घटनास्थळे आणि परिसरात माहिती घेत असताना पोलीस अंमलदार दिलीप राठोड आणि बाळासाहेब खेडकर यांना गोपनीय बातमीदारामार्फत विद्युत डीपीमधील तांब्याच्या तारा चोरणारे आरोपी मरकळ आणि पिंपळगाव परिसरात असल्याची माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मरकळ-पिंपळगाव परिसरात शोधमोहीम राबवली. यावेळी दुचाकीवरून जाणाऱ्या तीन संशयितांना विद्युत डीपी चोरीसाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्यांसह ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी सभाजित मुरलीधर गौतम जैस्वार (वय ४५), विनोद हरीराम जैस्वार (वय ४०) आणि मनिष महेंद्र प्रसाद (वय ३८), अशी नावे सांगितली. हे तिघेही उत्तर प्रदेशातील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अधिक तपासादरम्यान, त्यांनी जुलफकार खान (रा. मंत्रवाडी, उंड्री) या पाहिजे आरोपीच्या मदतीने मरकळ, पिंपळगाव आणि सोळू परिसरात विद्युत डीपी चोरीचे गुन्हे केल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी चोरीच्या तांब्याच्या तारांचे गड्डे, गुन्ह्यात वापरलेली हत्यारे आणि दुचाकी जप्त केली.
या कारवाईत आळंदी पोलीस ठाण्यात दाखल असलेले विद्युत डीपी चोरीचे सहा गुन्हे उघडकीस आले आहेत. यामध्ये सन २०२५ मधील तीन आणि सन २०२६ मधील तीन गुन्ह्यांचा समावेश आहे. या सर्व गुन्ह्यांमधील चोरीला गेलेला मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केले असून आळंदी पोलिस ठाण्यातील ६ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
गुन्हे शाखा युनिट-३चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील जावळे, भरत गोसावी तसेच पोलीस अंमलदार युवराज बिराजदार, सोमनाथ बोन्हाडे, बाळासाहेब खेडकर, दिलीप राठोड, स्वप्निल महाले आणि अजित रुपनवर यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
विद्युत डीपी चोरीमुळे वीजपुरवठा खंडित होण्यासह नागरिक आणि शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखा युनिट-३ने केलेली ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
