‘बेटा गुपचूप राहायचं गुमान, तुला काय कमी केले भीमान’ गीतातून उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर भाष्य; आंबेडकरी ऐक्याचा संदेश
नाशिक/येवला, (प्रतिनिधी) : आंबेडकरी चळवळीतील कवी, गायक, शाहीर आणि सामाजिक प्रबोधनकार विजय मोकळे करंजगावकर यांच्या ‘बेटा गुपचूप राहायचं गुमान, तुला काय कमी केले भीमान’ या भीमगीताचे लोकार्पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या हस्ते येथील मुक्तीभूमीवर करण्यात आले. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या या गीतातून संविधानिक हक्क, सामाजिक समता आणि आंबेडकरी चळवळीतील ऐक्याचा मुद्दा मांडण्यात आला आहे.
गीताच्या लोकार्पणप्रसंगी भीमराव आंबेडकर यांनी विजय मोकळे यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले. या गीतातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनकार्याची, संविधानाच्या माध्यमातून सामान्य माणसाला मिळालेल्या अधिकारांची आणि वंचित समाजाला स्वाभिमानाने जगण्याची दिशा देणाऱ्या विचारांची आठवण करून देण्यात आली आहे.
अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा मुद्दा सध्या चर्चेत असून, या विषयावरून विविध सामाजिक समूहांमध्ये मतभेद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर वंचित समाजातील ऐक्य कायम राहावे, सामाजिक संघर्ष वाढू नये आणि आरक्षणाच्या प्रश्नावर संविधानातील समतेच्या तत्त्वांचा विचार व्हावा, असा संदेश या गीतातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण, संघटन आणि संघर्षाच्या माध्यमातून वंचित समाजाला स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा दिली. सामाजिक विषमता आणि अस्पृश्यतेच्या विरोधात संघर्ष करताना त्यांनी भारतीय संविधानाच्या निर्मितीत महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या या कार्याचे स्मरण करून देतानाच, बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा जपण्याची जबाबदारी समाजातील प्रत्येक घटकाची आहे, अशी भूमिका गीतातून मांडण्यात आली आहे.
उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर समाजात संवाद व्हावा, मात्र त्यातून परस्परविरोध आणि सामाजिक फूट निर्माण होऊ नये, हा या गीताचा प्रमुख उद्देश असल्याचे विजय मोकळे यांनी सांगितले. आरक्षणाच्या प्रश्नावर विविध घटकांच्या भूमिका समजून घेताना सामाजिक वास्तव, वंचित समूहांचे प्रश्न आणि संविधानिक समतेचे तत्त्व यांचा विचार करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
१९९३ पासून सामाजिक प्रबोधनाचे कार्य
विजय मोकळे करंजगावकर यांचा सामाजिक प्रबोधनाचा प्रवास १९९३ पासून सुरू आहे. त्यांनी महाराष्ट्रभर ४०० हून अधिक प्रबोधनपर गीतगायनाचे कार्यक्रम केले असून, ‘मायबाप’ या विषयावर २०० हून अधिक प्रबोधनपर व्याख्याने दिली आहेत. गीत-संगीत आणि व्याख्यानांच्या माध्यमातून शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करण्याचे काम ते सातत्याने करत आहेत.
त्यांच्या आवाजातील आतापर्यंत १४ गाण्यांचे रेकॉर्डिंग झाले आहे. तसेच त्यांच्या चार कवितासंग्रहांना महाराष्ट्र शासनाची परवानगी मिळाली असून, हे संग्रह लवकरच प्रकाशित होणार आहेत.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभेचे येवला तालुकाध्यक्ष दीपकजी गरुड सर, वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य व पत्रकार प्रशांतजी त्रिभुवन, ‘राजगीर एक्सप्रेस’चे मुख्य संपादक प्रा. डॉ. आबासाहेब कसबे सर आणि कार्यकारी संपादक संजयजी पगारे साहेब यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
विजय मोकळे करंजगावकर यांचे ‘बेटा गुपचूप राहायचं गुमान, तुला काय कमी केले भीमान’ हे भीमगीत ‘VIJAY MOKALE OFFICIAL’ या यूट्यूब चॅनेलवर उपलब्ध असून, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, भीमगीतप्रेमी आणि रसिकांनी हे गीत अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
