भाजप कार्यकर्ते सचिन काळभोर यांची आयुक्तांकडे तक्रार; निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे लक्ष
पिंपरी-चिंचवड : आचारसंहिता लागू झाल्यानंतरही निगडी येथील पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर मोठा जाहिरात फ्लेक्स लावण्यात आल्याचा आरोप भाजपचे कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केला आहे. या प्रकरणी महापालिका प्रशासन आणि संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित यांच्याकडून हा जाहिरात फ्लेक्स लावण्यात आल्याचा आरोप करत काळभोर यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर शहरातील प्रमुख चौकांमध्येही मोठे जाहिरात फ्लेक्स लावण्यात आल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
आचारसंहितेच्या नियमांचे पालन करण्याची जबाबदारी प्रशासनाची असताना, महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाबाहेरच जाहिरात फ्लेक्स लावण्यात आल्याने नियमांच्या अंमलबजावणीबाबत प्रश्न उपस्थित होत असल्याचे काळभोर यांनी म्हटले आहे.
संबंधित फ्लेक्सची चौकशी करून नियमानुसार कारवाई करावी, तसेच आचारसंहितेचे उल्लंघन झाले असल्यास जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी, अशी मागणी सचिन काळभोर यांनी केली आहे. या तक्रारीवर महापालिका आयुक्त आणि निवडणूक आयोग काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.
