पिंपरी/ पिंपळे सौदागर : पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन रोडवर चहाच्या टपरीजवळ तरुणांवर लोखंडी कोयते आणि लाकडी दांडक्यांनी हल्ला केल्याची घटना ९ ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. या हल्ल्यात यशवंत राजाराम सूर्यवंशी (वय ३१) हे जखमी झाले आहेत. आरोपींनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली, तसेच हातातील शस्त्रे हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
याप्रकरणी सूर्यवंशी यांनी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी विजय रतन कोल्हे, संतोष ऊर्फ दादया नरवटे आणि अन्य सात अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दिलेल्या माहितीनुसार, यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
फिर्यादी यशवंत सूर्यवंशी हे मित्र विशाल आबा मोरे आणि आप्पाराव महादेव सूर्यवंशी यांच्यासोबत चहा पिण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर लाकडी दांडक्यांनी मारहाण करण्यात आली. संतोष ऊर्फ दादया नरवटे याने हातातील लोखंडी कोयत्याने सूर्यवंशी यांच्या कपाळावर वार करून त्यांना जखमी केल्याचा आरोप आहे.
हल्लेखोरांनी, “तू आमच्या विजय कोल्हे मामाच्या नादी लागतो का? थांब, तुला दाखवतो,” असे म्हणत मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर आरोपींनी जीवे मारण्याची धमकी देत हातातील कोयते आणि लाकडी दांडके हवेत फिरवले. “आम्ही इथले भाई आहोत. आमच्या कोल्हे मामाच्या नादी कोणी लागले तर त्याला संपवून टाकू,” असे ओरडून त्यांनी परिसरात दहशत निर्माण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह भारतीय हत्यार कायदा, महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्टच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सांगवी पोलीस करीत आहेत.