पिंपरी/भोसरी, (प्रतिनिधी) : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून मुलाने स्वतःच्या आई-वडिलांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. तसेच वडिलांना जीवे मारण्याच्या उद्देशाने चाकू उगारला. यावेळी पतीला वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या ६३ वर्षीय आईच्या हाताच्या मनगटाजवळ चाकू लागल्याने त्या जखमी झाल्या. त्यानंतर आरोपीने आईलाही मारहाण करून पोटात लाथ मारली. ही धक्कादायक घटना ८ ऑक्टोबर रोजी रात्री नऊच्या सुमारास भोसरीतील श्रीरामनगर, चक्रपाणी वसाहत परिसरात घडली.
या प्रकरणी ६३ वर्षीय महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहुल प्रल्हाद तळोले (वय ४५, रा. श्रीरामनगर, चक्रपाणी वसाहत, भोसरी) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९, ११५(२), ३५२ आणि ३५१(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून आपल्या वडिलांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, “तुम्ही मला दारू पिण्यासाठी पैसे देत नाही ना, आज तुम्हाला जिवंत सोडत नाही,” अशी धमकी दिली. त्यानंतर वडिलांच्या छातीवर लाथ मारून स्वयंपाकघरातील चाकू आणला आणि त्यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने चाकू उगारला.
पतीला आरोपीच्या तावडीतून सोडवण्यासाठी पत्नी मध्ये पडली असता चाकू त्यांच्या डाव्या हाताच्या मनगटाजवळ लागून त्या जखमी झाल्या. आरोपीने त्यांनाही मारहाण करून पोटात लाथ मारली आणि ढकलून दिले. त्यानंतर वडिलांच्या डाव्या डोळ्याजवळ बुक्क्यांनी मारहाण करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.या प्रकरणाचा पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत.