दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल
पुणे/कुरुळी / निघोजे (प्रतिनिधी)...खेड तालुक्यातील कुरुळी येथे इमारतीच्या पार्किंगमध्ये उभी केलेली होंडा अॅक्टिव्हा स्कूटर अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. तर निघोजे येथे किरकोळ कारणावरून झालेल्या वादात एका तरुणाला मारहाण करून त्याचा डावा हात फ्रॅक्चर केल्याची घटना घडली आहे. या दोन्ही प्रकरणी दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कुरुळीतून ॲक्टिव्हा स्कूटरची चोरी
कुरुळी गावातील बागडेवस्ती, दत्त मंदिराजवळील इमारतीच्या पार्किंगमधून होंडा अॅक्टिव्हा स्कूटर चोरीला गेली. सुखदेव नाना बागडे (वय ६२, रा. बागडेवस्ती, कुरुळी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
१० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० ते ११ ऑक्टोबर रोजी पहाटे ५.३० या कालावधीत फिर्यादी यांची एमएच १४ ईटी ०२०२ क्रमांकाची, अंदाजे २० हजार रुपये किमतीची स्कूटर इमारतीच्या पार्किंगमध्ये उभी होती. स्कूटरला चावी राहिल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने ती चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी ११ ऑक्टोबर रोजी गुन्हा रजिस्टर क्रमांक ८३९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निघोजेत मारहाण; तरुणाचा डावा हात फ्रॅक्चर
दुसऱ्या घटनेत निघोजे येथील गणेश मंदिराच्या पाठीमागे एका तरुणाला मारहाण करून गंभीर दुखापत करण्यात आली. माधव लक्ष्मण जाधव (वय ३१, व्यवसाय खासगी नोकरी, रा. नाणेकरवाडी, चाकण) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
११ ऑक्टोबर रोजी दुपारी एकच्या सुमारास फिर्यादी आणि आकाश फडके एकत्र असताना आरोपी योगेश बसंत वेळवंडे याने तेथे येऊन फिर्यादीला शिवीगाळ केली. त्यानंतर हाताने मारहाण करून खाली पाडले आणि छातीवर, पोटावर तसेच हातावर लाथा मारल्या. या मारहाणीत फिर्यादीच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत होऊन हात फ्रॅक्चर झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी ११ ऑक्टोबर रोजी रात्री ८.०३ वाजता गुन्हा रजिस्टर क्रमांक ८४०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ११७(२), ११५(२), ३५१(२) आणि ३५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार करीत आहेत.