लक्ष्मी चौकात उड्डाणपुलाच्या हालचालींना वेग; PWDकडून प्राथमिक आराखडा तयार
पुणे : हिंजवडी परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी लक्ष्मी चौकात उड्डाणपूल उभारण्याच्या हालचालींना वेग आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) या प्रस्तावित प्रकल्पाचा प्राथमिक आराखडा तयार केला असून, सूचना व अभिप्रायासाठी तो पीएमआरडीए (PMRDA) आणि एमआयडीसीकडे (MIDC) पाठविण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या काही काळापासून रखडलेल्या या प्रकल्पाच्या प्रक्रियेला आता गती मिळण्याची शक्यता आहे.
हिंजवडी परिसरातील लक्ष्मी चौक हा वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. विविध दिशांनी येणारे प्रमुख रस्ते या चौकात एकत्र येत असल्याने सकाळी आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते. परिणामी वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर लक्ष्मी चौकात उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे.
मात्र, या प्रकल्पाची अंमलबजावणी नेमकी कोणत्या यंत्रणेमार्फत करायची, याबाबत गेल्या काही काळापासून संभ्रम होता. दरम्यान, ११ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर प्रकल्पाच्या प्रक्रियेला चालना मिळाली आहे. प्रस्तावित उड्डाणपुलाच्या आराखड्याचे सादरीकरण जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात येणार असून, त्यानंतर अंतिम डिझाइन निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
तीन पर्यायांचा तांत्रिक अभ्यास
वाहतूक व्यवस्थेचा सखोल विचार करून प्रस्तावित उड्डाणपुलासाठी सध्या तीन पर्यायांचा अभ्यास करण्यात येत आहे. यापैकी वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी सर्वाधिक प्रभावी, व्यवहार्य आणि तांत्रिकदृष्ट्या योग्य पर्यायाची निवड केली जाणार आहे.
लक्ष्मी चौक परिसरातील बहुतांश रस्ते एमआयडीसीच्या अखत्यारीत असल्याने उड्डाणपुलाच्या आराखड्याबाबत एमआयडीसीच्या सूचनांना विशेष महत्त्व आहे. तसेच पीएमआरडीएकडूनही या प्रस्तावावर अभिप्राय मागविण्यात आला आहे.
दोन महिन्यांत भूसंपादनाचे नियोजन
प्रकल्पासाठी आवश्यक असलेले भूसंपादन येत्या दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच डिसेंबरपासून प्रत्यक्ष काम सुरू करण्याचे निर्देश यापूर्वीच देण्यात आले आहेत. त्यामुळे प्राथमिक आराखड्यावर संबंधित यंत्रणांचे अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर अंतिम आराखडा निश्चित करून पुढील कार्यवाहीला वेग येण्याची शक्यता आहे.
अभियंता भरतकुमार बाविस्कर यांच्या माहितीनुसार, लक्ष्मी चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कोणता पर्याय सर्वाधिक फायदेशीर ठरेल, याचा सध्या तांत्रिक पातळीवर अभ्यास सुरू आहे. अंतिम पर्याय निश्चित झाल्यानंतर प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या दिशेने पुढील पावले उचलली जाणार आहेत.
