आळंदी, मरकळ परिसरातील सात गुन्ह्यांची उकल; चोरीचा १०० टक्के माल हस्तगत
पिंपरी-चिंचवड आळंदी प्रतिनिधी : आळंदी, मरकळ, भानोबाची कोयाळी आणि वडगाव घेनंद परिसरातील विद्युत डीपीमधून तांबे व अॅल्युमिनियमच्या तारा चोरी करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखा, युनिट-३ने पर्दाफाश केला. या कारवाईत चार आरोपींना अटक करून तब्बल १६ लाख ३५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींकडून आळंदी व दक्षिण चाकण पोलीस ठाण्यांतील सात गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून, संबंधित गुन्ह्यांतील चोरीचा १०० टक्के माल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखा युनिट-३चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक या चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करीत होते.
दि. ३ सप्टेंबर रोजी पोलीस अंमलदार बाळासाहेब खेडकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पथकाने भानोबाची कोयाळी परिसरात सापळा रचून अक्षय बाबासाहेब काळे (३४) आणि राहुल दिनकर पोकळे (२०) या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी ललित मगर ऊर्फ नेपाळ्या याच्यासह विद्युत डीपीमधील तांबे व अॅल्युमिनियमच्या तारा चोरल्याची कबुली दिली.
चोरीचा माल भंगार विक्रेत्यांना विकल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ईजहार इस्माइल चौधरी (४०) आणि ब्रिजगोहन असर्फीलाल प्रजापती (३०) यांनाही ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून ५ लाख १० हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या व अॅल्युमिनियमच्या तारा जप्त करण्यात आल्या. तसेच गुन्ह्यांसाठी वापरलेली तीन दुचाकी व चारचाकी वाहने पोलिसांनी हस्तगत केली.
या कारवाईत आळंदी पोलीस ठाण्यातील चार आणि दक्षिण चाकण पोलीस ठाण्यातील तीन, असे एकूण सात गुन्हे उघडकीस आले आहेत. या सर्व गुन्ह्यांतील चोरीचा माल पूर्णपणे जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. सुदर्शन राठोड यांच्या आदेशानुसार करण्यात आली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार बाबासाहेब गर्जे, सोमनाथ बोऱ्हाडे, ऋषीकेश भोसुरे, युवराज बिराजदार, सागर सूर्यवंशी, सचिन गोनटे, बाळासाहेब खेडकर, स्वप्निल महाले, अजित रुपनवर, निखील फपाळे, नितीन गुंजाळ, शशिकांत नांगरे व बाळासाहेब भांगले यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केली.