चार महिला, तीन पुरुषांना अटक; इनोव्हा व रिक्षासह ₹७.२१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
पिंपरी : वाकड परिसरातील स्टार बाजारमध्ये काजू, बदाम, तूप आदी महागड्या खाद्यवस्तूंची चोरी करणाऱ्या सराईत टोळीला वाकड पोलिसांच्या तपास पथकाने जेरबंद केले आहे. पोलिसांनी चार महिला आणि तीन पुरुषांना अटक करून त्यांच्याकडून इनोव्हा कार, ऑटो रिक्षा तसेच चोरीचा माल असा एकूण ७ लाख २१ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
२९ ऑगस्ट रोजी वाकड येथील स्टार बाजार तसेच १२ ऑगस्ट रोजी कलाटे वस्ती येथील स्टार बाजारमधून काजू, बदाम, गोवर्धन तूप आदी खाद्यवस्तूंची चोरी झाली होती. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे चोरीसाठी वापरलेल्या इनोव्हा कारचा माग काढला. ही कार ताथवडे-वाकड परिसरात आढळून आल्यानंतर पोलिसांनी कार व रिक्षासह रविकांत जाकरे, ब्रिजेश मदेशिया, ब्रिजेश यादव, सोनम शेख, सलमा शेख, सानिया शेख आणि रूमा मदेशिया या सात जणांना ३१ ऑगस्ट रोजी अटक केली.
पोलीस कोठडीतील चौकशीत आरोपींनी वाकडसह पिंपरी आणि चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्टार बाजारमध्येही चोरी केल्याची कबुली दिली. तसेच काटे पिंपळे, केसनंद फाटा आणि वाघोली येथील स्टार बाजारमधूनही काजू, बदाम व तुपाच्या पाऊचची चोरी केल्याचे तपासात समोर आले आहे.
आरोपी हे सराईत व रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांनी पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, मुंबई तसेच महाराष्ट्रातील इतर भागांत अशाच प्रकारचे गुन्हे केले असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. याबाबत पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, पोलीस उपआयुक्त प्रदीप जाधव आणि सहायक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाकड पोलिसांनी केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक श्रीनिवास दराडे करीत आहेत.