पुणे/लोहगाव, प्रतिनिधी दि. १ सप्टेंबर २०२६ : लोहगाव येथील गजानन मंगल कार्यालयात आयोजित **‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरा’**ला उपस्थित राहून महसूल विभागाच्या कामकाजाचा प्रत्यक्ष आढावा घेण्यात आला. यावेळी परिसरातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या महसुली अडचणी जाणून घेण्यात आल्या.
शिबिरात प्रलंबित फेरफार नोंदी, ७/१२ व ८-अ उताऱ्यांमधील दुरुस्ती, डिजिटल उताऱ्यांचे थेट वाटप, तसेच उत्पन्न, रहिवासी आणि जात प्रमाणपत्रांसंबंधी अर्ज निकाली काढण्यात आले. पात्र नागरिकांना विविध शासकीय दाखलेही यावेळी सुपूर्द करण्यात आले.
याशिवाय नवीन रेशन कार्ड नोंदणी व दुरुस्ती, आधार कार्ड अपडेट, मतदार यादी नोंदणी तसेच संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करून त्यांना योजनांचे लाभ देण्यात आले.
एकाच छताखाली १५ हून अधिक महसुली सेवा उपलब्ध झाल्याने शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांचा वेळ वाचला. अनेक प्रलंबित प्रशासकीय अडचणींचे तात्काळ निराकरण झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.यावेळी महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी, स्थानिक नागरिक तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.
