८६ लाखांच्या फसवणूक प्रकरणात पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांची कारवाई; आठ बँक खाती सायबर गुन्ह्यांसाठी वापरल्याचा संशय
पिंपरी प्रतिनिधी: शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास मोठा आर्थिक फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ज्येष्ठ नागरिकाची तब्बल ८६ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. विशेष म्हणजे, सायबर गुन्ह्यात यापूर्वी दीड वर्ष न्यायालयीन कोठडीत राहिलेल्या आरोपीने कारागृहात झालेल्या ओळखींच्या माध्यमातून सायबर गुन्ह्यांसाठी बँक खाती मिळविल्याचे तपासात समोर आले आहे.
या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गु.र.नं. २९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३३६(२), ३३६(३), ३३८, ३१८(४), ३१६(२), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००८ मधील कलम ६६(सी), ६६(डी) नुसार गुन्हा दाखल आहे.
फिर्यादी ज्येष्ठ नागरिक असून, त्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा आर्थिक फायदा मिळेल, असे आमिष दाखविण्यात आले. त्यानंतर वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास सांगून त्यांची ८६ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली.
गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांना १४ जुलै २०२६ रोजी पाच लाख रुपये इंडसइंड बँकेतील एका खात्यात जमा झाल्याचे आढळले. हे खाते तेजस ज्ञानोबा लोखंडे (वय २४, रा. मरकळ, पुणे) याच्या नावावर असल्याचे निष्पन्न झाले. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
चौकशीत तेजस लोखंडे याची हिंजवडी पोलीस ठाण्यातील अपहरण व खंडणीच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असताना अविनाश ज्ञानोबा बाकलीकर याच्याशी येरवडा कारागृहात ओळख झाल्याची माहिती समोर आली. कारागृहात असतानाच सायबर गुन्ह्यांसाठी बँक खाती मिळविण्याचे नियोजन केल्याचे तपासात उघड झाले.
जामिनावर बाहेर आल्यानंतर अविनाश बाकलीकरच्या सांगण्यावरून तेजसने बँक खाते उघडून ते त्याला दिल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले.
अविनाश बाकलीकर याला यापूर्वी सायबर पोलीस ठाणे गु.र.नं. ०१/२०२४ मधील सायबर गुन्ह्यात २०२४ मध्ये अटक झाली होती. या गुन्ह्यात तो सुमारे दीड वर्ष न्यायालयीन कोठडीत होता. जामिनावर सुटल्यानंतर त्याने कारागृहातील संपर्कांचा वापर करून पुन्हा सायबर गुन्ह्यांचे जाळे उभारल्याचे तपासात समोर आले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, अविनाशने येरवडा कारागृहातील शरीराविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या आरोपींशी संपर्क वाढविला होता. त्यांच्या मोबाईल क्रमांकांना ‘युनिव्हर्सिटी’ या नावाने सेव्ह करून ठेवण्यात आले होते. जामिनावर सुटल्यानंतर या व्यक्तींसह इतर साथीदारांच्या संपर्कात राहून सायबर गुन्हे केल्याची माहिती तपासात मिळाली आहे.
आतापर्यंत वेगवेगळी आठ बँक खाती उघडून किंवा मिळवून ती सायबर गुन्ह्यांसाठी वापरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. एवढेच नव्हे तर आणखी करंट अकाउंट उघडण्यासाठी SUSTAINBLOCK CONSTRUCTION PVT LTD आणि STRUNOVA PVT LTD या नावाने कार्यालये सुरू केल्याचेही पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. या माध्यमातून आणखी सायबर गुन्हे करण्याची तयारी सुरू असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
अविनाश बाकलीकर हा बीएएमएस (डॉक्टर) पदवीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असून, परदेशातील साथीदारांच्या संपर्कात राहून अशा प्रकारचे सायबर गुन्हे करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणात तेजस ज्ञानोबा लोखंडे (वय २४, रा. मरकळ, पुणे) आणि अविनाश ज्ञानोबा बाकलीकर (वय २८, रा. जि. लातूर) यांचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड करीत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि सहायक पोलीस आयुक्त, सायबर व आर्थिक गुन्हे रोहिणी बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे व पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी, सहायक पोलीस निरीक्षक वैभव पाटील, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कातकाडे तसेच रोहित डोळस, हेमंत खरात, दीपक भोसले, श्रीकांत कबुले, विनायक म्हसकर, स्वप्निल खणसे, सुनील यादव, विशाल निचित, अतुल लोखंडे, माधव आरोटे, सोपान बोधवड, देवा वाघमारे, सुरज शिंदे आणि महिला पोलीस अंमलदार दीपली चव्हाण, स्मिता पाटील यांनी सहभाग घेतला.
सायबर पोलीस ठाणे, पिंपरी-चिंचवडकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, गुन्ह्यातील इतर आरोपी तसेच आर्थिक व्यवहारांशी संबंधित व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे.
