पिंपरी प्रतिनिधी : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउली यांच्या ७५०व्या जन्मवर्षाचे औचित्य साधून श्री. संदीप बाळकृष्ण वाघेरे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘मोगरा फुलला’ हा भक्तिमय संगीत सोहळा चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या सोहळ्याला रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
बुधवार, दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत झालेल्या कार्यक्रमात संत ज्ञानेश्वर माउलींच्या अभंग, ओव्या, आध्यात्मिक विचार आणि समृद्ध भक्तिपरंपरेचा सुरेल जागर करण्यात आला. डॉ. गणेश शिंदे यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांचे साहित्य, अध्यात्म आणि भक्तिपरंपरा याविषयी प्रभावी व्याख्यानातून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
प्रसिद्ध गायिका सौ. सन्मिता शिंदे यांच्या सुमधुर स्वरातून ज्ञानेश्वर माउलींच्या अभंग-ओव्यांचे सादरीकरण झाले. त्यांच्या भावपूर्ण गायनाने संपूर्ण सभागृह भक्तिरसात चिंब भिजून गेले.
‘मोगरा फुलला’ या उपक्रमाच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अमृतमय साहित्याचा, आध्यात्मिक विचारांचा आणि महाराष्ट्राच्या समृद्ध संतपरंपरेचा जागर करण्यात आला. ज्ञानेश्वर माउलींच्या अभंग-ओव्यांमधील भक्ती, ज्ञान, अध्यात्म आणि मानवतावादी विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा स्तुत्य प्रयत्न या कार्यक्रमातून करण्यात आला.
या कार्यक्रमास नगरसेवक संदीप वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, स्थायी समिती सदस्या सुलभाताई उबाळे, स्थायी समितीच्या माजी सभापती सीमा सावळे, प्रियांका कुदळे, अरुणा लंगोटे, राजू बनसोडे, विराज लांडे, अनंत कोऱ्हाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी चंद्रशेखर अहिरराव, जितेंद्र वाटकर, किरण शिंदे, गणेश मंजाळ, राघवेंद्र भांडगे आणि कैलास वाघेरे यांनी विशेष परिश्रम घेतले.
संत ज्ञानेश्वर माउलींच्या विचारांचा आणि भक्तिपरंपरेचा सुरेल आविष्कार घडविणारा ‘मोगरा फुलला’ हा संगीत सोहळा पिंपरी-चिंचवडच्या सांस्कृतिक वैभवात मोलाची भर घालणारा ठरला. भक्तिमय वातावरण, दर्जेदार व्याख्यान आणि सुमधुर गायन यामुळे हा सोहळा उपस्थित रसिकांच्या कायम स्मरणात राहील, अशी भावना आयोजकांच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
